महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून एका नव्या अंदाजात तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेत तिची नेमकी कोणती भूमिका असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र हे नवं पात्र साकारण्यासाठी तेजश्री प्रचंड उत्सुक आहे.
या नव्या पात्राविषयी सांगताना तेजश्री म्हणाली, ‘मी ठरवून एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणं टाळते. देवकृपेने प्रेक्षक माझ्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत असतात. जसं घरातली एखादी व्यक्ती कामानिमित्ताने बाहेर गेली की घरातले तिच्या वाटेकडे डोळे लावून बसेलेले असतात. अगदी तसाच अनुभव एक कलाकार म्हणून मीही घेतलाय. गेले कित्येक दिवस पुन्हा कधी भेटीला येणार याविषयी विचारणा होत होती. स्टार प्रवाहवर लवकरच एका नव्या मालिकेतून मी भेटीला येणार आहे हे सांगताना अतिशय आनंद होतोय.
मला सकारात्मक भूमिका साकारायला आवडतं. माझी नवी भूमिका देखील सकारात्मकच असेल. टेलिव्हिजन हे माझं आवडतं माध्यम आहे. खरंतर कोरोना नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. सोशल मीडियाचं महत्त्वही दिवसेंदिवस वाढत आहे. मी या सर्वच गोष्टी पुन्हा एकदा नव्याने अनुभवतेय. प्रामाणिकपणे काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आले आहे आणि यापुढे देखील करत राहिन. प्रेक्षकांचं प्रेम असंच मिळत राहो हीच अपेक्षा. जवळपास १२ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहची तुझं नि माझं घर श्रीमंताचं ही मालिका केली होती. काही दिवसांपूर्वी फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. नव्या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे.