बाईच्या भारीपणाची प्रचिती देणारा केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिनेमा पहायला केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांचीही गर्दी पाहायला मिळते आहे. बॉक्स ऑफीसवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची गर्दी खेचण्यात यशस्वी ठरलेल्या या सिनेमानं कोटींमध्ये कमाई केलेली आहे. अशा वेळी ‘कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत.’ अशा आशयाची एक पोस्ट केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केलेली आहे.
या पोस्टमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाला बाईपण भारी देवा हे नाव कोणी दिलंय, या गोष्टीचा खुलासा केला आहे. बाईपण भारी देवा सिनेमाचं नाव आधी मंगळागौर होतं. सिनेमाची स्क्रिप्ट जेव्हा कलाकारांना देण्यात आली तेव्हा त्यावर मंगळागौर लिहिलं होतं. पण नंतर मात्र हे नाव बदलून बाईपण भारी देवा हे नाव देण्यात आलं. हे नाव कोणी सुचवलं याचा खुलासा खुद्द केदार शिंदेंनीच केलाय.
केदार शिंदेंनी पोस्ट करत लिहीलंय की... बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं "मंगळागौर". ते बदलण्याचा विचार जेव्हा आला तेव्हा, अजित भुरे यांनी सुचवलं की, गाण्याची catch line जी आहे ती ठेवली तर? बाईपण भारी देवा याचं credit पूर्ण वलय मुळगुंद या गीतकाराचं आहे. ते गाणं त्यानं फारच अप्रतिम लिहिलं आहे.
केदार शिंदे शेवटी लिहीतात... स्त्री केंद्रस्थानी ठेवून तिच्या भावभावना उत्तम मांडल्या आहेत. आणि ती शेवटची कविता!!! माझी मैत्रीण @ashwinithepoem त्यावेळी मदतीला धावून आली. या सिनेमाचा शेवट वेगळा होता.
पण मंगळागौर गाणं संपल्यावर एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कुठला सीन करणं जड जाणार होतं. ही कवितेची आयडिया डोक्यात आली. संपूर्ण सिनेमाचे सार व्यक्त करणारी ती कविता अश्विनीने लिहिली. या प्रवासात असंख्य माणसं महत्वाची ठरली. कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत.