Close

नवाजुद्दीन सिद्दिकीला करायची आहे ‘सेक्स गुरू’ ओशो यांची भूमिका (Will Nawazuddin Siddiqui Play The Role Of Osho What Expressed Desire)

बजरंगी भाई जान, किक, गँग्स ऑफ वासेपूर, द लंचबॉक्स. रमन राघव २.०, मंटो यासारख्या चित्रपटांमध्ये सक्षम भूमिका करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रभावशाली अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘हड्डी’ सिनेमातील तृतीय पंथियाच्या भूमिकेनंतर नवाजुद्दीन याचा ‘रौतू की बेली’ हा मर्डर मिस्ट्री सिनेमा काही दिवसात रिलीज होणार आहे.

आनंद सुरापूर यांनी रौतू की बेली चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. गोवा येथे सुरु असलेल्या ५४ व्या (इफ्फी) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रौतू की बेली चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा पार पडला. उत्तर भारतातील पर्वतीय भागातील रौतू की बेली या शहरावर हा चित्रपट आधारित आहे. शहरातील एका शाळेचा वॉर्डन मृत आढळतो. त्याच्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नेगी हा तपास मोहिमेवर निघतो, अशी या चित्रपटाची साधारण कथा आहे. नवाजुद्दीन याने या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केलीय.

प्रीमियर सोहळाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नवाजुद्दीन याने स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या अस्सल कथांना जागतिक ओळख मिळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच, जितके स्थानिक चित्रपट असतील तितके ते अधिक जागतिक स्तरावर पोहचतील, असे मत व्यक्त केले.

चित्रपटातील भूमिका कशी निवडता, याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाजुद्दीन म्हणाला, एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिरेखांपुरतेच मला मर्यादित राहायचे नाही, व्यक्तिरेखांच्या वैविध्यतेला माझे प्राधान्य असेल. कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचे जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, जेणेकरुन त्या व्यक्तिरेखेचे आयुष्य आणि त्याचे स्वतःचे जीवन एकमेकात विलीन होईल. तसेच, संधी मिळाली तर मला आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल असेही त्याने सांगितले.

मृत्यूनंतर काय होते याचा शोध घेण्यासाठी स्मशानात जाणारा अवलिया आचार्य रजनीश ओशो यांनी ‘संभोगातून समाधी’कडे जाण्याचा मंत्र दिला. त्यामुळे ते ‘सेक्स गुरू’ ठरले. ओशी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं. गावोगावी, देशोदेशी जाऊन त्यांनी प्रवचने दिली. पुस्तकं वाचण्याचं त्यांना प्रचंड वेड होतं. संपूर्ण आयुष्यात एक लाखाहून अधिक पुस्तके वाचणारा हा अवलिया. बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त राहणारे ओशो. याच ओशो यांची भूमिका करण्याची इच्छा नवाजुद्दीन यांनी व्यक्त केली आहे.

Share this article