Close

वाण (Short Story: Vaan)

प्रणोतीने चमकून आपल्या लेकीकडे पाहिले. प्रज्ञाच्या डोळ्यात फुललेला तो तिरस्कार, राग व चेहर्‍यावरचे ठाम भाव पाहून आपण उगाच नको त्या विषयाला हात घालून प्रज्ञाला डिवचले, असे तिला वाटले. ती संध्याकाळ व ती रात्र त्या मायलेकीत अबोला धरूनच पार पडली होती.

“आई मी मुळी लग्नच करणार नाही आणि तू सुद्धा यापुढे माझ्या समोर लग्नाच्या गोष्टी करत जाऊ नको. मी आजन्म अविवाहित राहण्याचं ठरविलं आहे. आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस. आता यापुढे प्रत्येक दिवस मी तुझ्यासोबत तुझ्या कष्टाला हातभार लावण्यासाठी माझे आयुष्य खर्ची करणार आहे. आई मी लग्न न केल्यामुळे ह्या जगात मोठा भूकंप होणार नाही किंवा कोणाचे वाईटही होणार नाही. आजवर तू केलेल्या कष्टांचे पांग काही प्रमाणात का होईना फेडण्यासाठी मी माझ्याकडून प्रयत्न करणार आहे. माझ्या या निर्णयासाठी मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.”
“प्रज्ञा अगं पोरी, तू वेडी की खुळी. म्हणे मी लग्नच करणार नाही. अग मुलगी कितीही शिकली,
स्वतःच्या पायावर उभी राहिली तरी तिला पुरुषाच्या मदतीची, त्याच्या साथीची गरज लागणारच. स्त्रीचे आयुष्यच मुळी लग्न व संसार आहे. मातृत्वाशिवाय स्त्रीला पूर्णत्व नाही. मी जे काही केले ते माझे कर्तव्यच होते. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या सुखासाठी हे सारे करीत असते. तुला बोहल्यावर चढलेली, गळ्यात मंगळसूत्र घातलेली व नवर्‍यासोबत सप्तपदी घालताना मला पाहावयाची इच्छा आहे. त्याकरिताच माझे हे डोळे व मन आसुसले आहे. ते सारे पाहूनच मी माझ्या जीवनाची इतिश्री
करणार आहे.”
“थांब आईऽ थांब. असे टोकाचे निर्णय घेऊ नको व तुझे ते बुरसटलेले विचारदेखील माझ्यासमोर काढू नको. स्त्रीच्या जीवनाचे पूर्णत्व तिचे लग्न व मातृत्वात आहे असे तू म्हणतेस. मग तुझे जीवन आजतागायत असे अपूर्णच का राहिले. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू लग्न केलेस. मला जन्म देऊन मातृत्व देखील मिळवलेस, तरी पण तू तुझ्या जीवनात अशी अधुरी का राहिलीस? तू असा कोणता गुन्हा केला होतास की, ज्यामुळे तुझा नवरा व माझा बाप म्हणवणारा माणूस तुला व मला वार्‍यावर सोडून भरल्या संसारातून चालता झाला? आजही तू त्याच्या नावाने गळ्यात मंगळसूत्राचे लोढणे का घालून फिरत आहेस? तुझ्या कपाळावरचे ते सौभाग्याचे कुंकू सध्या तुझे नाही, हे तू उजळ माथ्याने जगाला का सांगू शकत नाहीस? बाप असूनही मी आज पोरकी का वाढत आहे? आई आजवर जी उत्तरे तू मला दिली नाहीस त्या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे ह्या क्षणी मला दिली पाहिजेत. मला जर तुझी ती उत्तरे, ते स्पष्टीकरण योग्य वाटले तर मी माझा हट्ट सोडून तू म्हणशील त्या मुलाच्या गळ्यात वरमाला घालीन. अन्यथा हा विषय इथेच संपला, असे समजून तू या विषयाला तिलांजली दिली पाहिजे.”
प्रणोतीने चमकून आपल्या लेकीकडे पाहिले. प्रज्ञाच्या डोळ्यात फुललेला तो तिरस्कार, राग व चेहर्‍यावरचे ठाम भाव पाहून आपण उगाच नको त्या विषयाला हात घालून प्रज्ञाला डिवचले, असे तिला वाटले. ती संध्याकाळ व ती रात्र त्या मायलेकीत अबोला धरूनच पार पडली होती. रात्रीच्या जेवणाची वेळ व जेवणदेखील अबोलपणात झाले होते. प्रणोती आवरासावर करून आपल्या खोलीतल्या गादीवर पडली. प्रणोती झोपेची प्रतीक्षा करीत गादीवर डोळे मिटून पडली खरी पण झोप तिच्यापासून बरीच लांब गेली होती. आज वीस वर्षांनंतर प्रज्ञाने नकळत तिच्या जखमेवरील खपली काढली होती. आज कारण नसताना या गोष्टींना उजाळा मिळाला होता…
शनिवार पेठेतील त्या तीन खणी घरात प्रणोतीचे कुटुंब राहत होते. आईवडील आणि प्रणोती असे ते त्रिकोणी कुटुंब होते. प्रणोतीचे वडील शिक्षक होते आणि आई एक उत्तम गृहिणी होती. प्रणोती पदवीधर झाली आणि तिच्या वडिलांची सेवानिवृत्तीची तारीखही जवळ आली. प्रणोतीने स्वतःसाठी काम शोधायला सुरुवात केली व काही दिवसांच्या प्रयत्नांनी तिला एका खाजगी कंपनीत काम मिळाले. आईवडिलांचे सारे लक्ष आता प्रणोतीच्या लग्नाकडे होते. प्रणोतीला देखील आपल्या वडिलांच्या काळजीतून मुक्त व्हायचे होते. त्याच वेळी तिची भेट प्रसादशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.आईवडिलांनीही त्यांच्या लग्नाला होकार दिला. पण त्यांच्या लग्नात एक अडचण होती. प्रसाद अनाथ मुलगा होता. दूरच्या नातेवाइकांनी त्याचा सांभाळ केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाडेकरू म्हणून प्रसाद स्वतंत्र राहत होता. यामुळेच चांगले घर भाड्याने मिळेपर्यंत त्यांचे लग्न लांबणीवर टाकावे लागणार होते. शेवटी प्रणोतीने त्यातून मार्ग काढला.
ती व प्रसाद लग्न करून आपल्या वडिलांच्या घरात राहावयास आले तर त्यांच्या घराचा प्रश्‍न सुटेल व तिच्या आईवडिलांच्या जबाबदारीचा प्रश्‍नही सुटेल हा विचार करून तिने याबाबत आईवडिलांशी विचार विनिमय केला. त्यांनीही तिच्या प्रस्तावाला आनंदाने होकार दिला.


प्रणोती-प्रसादचं लग्न झालं. त्यांच्या आनंदी संसाराची पाच वर्ष पाहता पाहता निघून गेली. प्रणोतीचे आईवडील देखील समाधानी व आनंदी होते. प्रणोतीला एक कन्यारत्न झाले. तिने तिचे नाव प्रज्ञा ठेवले. नातीचे लाड, कौतुक करत आजीआजोबांचा वेळ निघून जायचा. काळ निघून जातो तसा प्रणोतीला आपल्या आईवडिलांच्या मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आली. एका अल्पशा आजाराने तिचे वडील मरण पावले तर तो धक्का सहन न होऊन आईही महिनाभरातच मरण पावली. आईवडिलांच्या वियोगाचे दुःख तिने प्रज्ञा आणि प्रसादच्या सहवासात सहजगत्या पचविले. पण येणार्‍या संकटांना तिला एकटीलाच तोंड देणे भाग होते.
प्रसाद ज्या कंपनीत कॅशिअर होता त्या कंपनीत दीड लाखांचा अपहार झाला होता. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा प्रसादवर संशय होता. त्यांनी प्रसादला याबाबत जाब विचारला. प्रसादने ते आरोप साफ फेटाळले. पण परिस्थितीजन्य पुरावे मात्र प्रसादच्या विरुद्ध जात होते. त्यानुसार दीड लाख रुपयांची अफरातफर प्रसादनेच केली हे सिद्घ झाले. प्रसादने खूप विनवण्या केल्या, पण एक महिन्याच्या आत दीड लाख रुपये कंपनीला देऊन नोकरी सोडावी असे कंपनीकडून सांगण्यात आले.
प्रसादने हा प्रकार प्रणोतीच्या कानावर घातला. आपण पूर्णपणे निर्दोष असून लवकरच हे आपण सिद्ध करून दाखवू हेही सांगितले. पण प्रणोतीलाही काय करावे हे समजत नव्हते. दीड लाख रुपये भरल्याशिवाय प्रसादची सुटका होणार नव्हती. पण हे दीड लाख रुपये एका महिन्यात जमा कसे करायचे, हाच विचार ती करीत होती. शेवटी प्रसादने तिला ह्यावर उपाय सांगितला. प्रणोतीने आपले राहते घर गहाण ठेवावे व एकरकमी दीड लाख रुपयांची रक्कम कर्ज म्हणून व्याजाने घ्यावी. दोघांच्या पगारातून ती रक्कम लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करून काळजीमुक्त होता येईल, असे त्याचे म्हणणे होते.
घर गहाण टाकून पैसा उभारण्याच्या कल्पनेनेच तिला शहारल्यासारखे झाले होते. जर आपण वेळेवर कर्ज फेडू शकलो नाही तर आपल्या डोळ्यासमोर वडिलांनी कष्टाने उभारलेले घर आपल्या हातून कायमचे जाईल. प्रसादची नोकरी जाणार हे पक्केहोते, पण दुसरी नोकरी कधी मिळेल याचा अंदाज येत नव्हता. प्रज्ञा आता हळूहळू मोठी होत होती. तिचा सर्व खर्च, शालेय शिक्षण व घरगृहस्थीचा खर्च होताच. आपल्याला मिळणार्‍या पगारातून आपण बँकेचे व कर्जाचे हप्ते नियमितपणे भरू फेडू शकू का? हा सर्वात मोठा प्रश्‍न तिच्यासमोर होता. पण त्याचे उत्तर तिच्याजवळ नव्हते. अखेर प्रसादच्या सुरक्षिततेसाठी व इज्जतीसाठी घर गहाण टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला व प्रसादची सुटका करावी लागली.
पाहता पाहता या घटनेला सहा महिन्यांचा अवधी लोटला. पण प्रसादला नोकरी मिळाली नव्हती. त्याने लपवाछपवी केली तरी बदनामीचे सावट तो दूर करू शकला नाही. प्रणोतीची काळजी वाढत होती आणि तशातच तिला प्रसादचे नवे रूप पहावयास मिळाले. नोकरी शोधण्याचे निमित्त करून प्रसाद सकाळी घराबाहेर जायचा तो रात्रीच परत यायचा. त्याच्या तोंडाला मद्याचा वास यायचा. तोंडात असभ्य भाषा असायची. जेव्हा तिची सहनशक्ती संपली तेव्हा तिने त्याला या वागण्याचा जाब विचारला असता त्याने अतिशय असभ्य भाषेत उत्तर दिले. प्रसादला नोकरी मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. अशातच प्रसाद चार दिवस घरी आला नाही. त्याच्या काळजीने ती वेडीपिशी झाली. एका परिचित माणसाला बरोबर घेऊन ती जवळच्या पोलीस स्टेशनमधे गेली तेव्हा तिला जे सत्य समजले ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दारूच्या नशेत प्रसादचे दारूच्या गुत्त्यावर भांडण झाले व त्या भांडणात एक माणूस जबर जखमी झाला. गुत्ता चालविणार्‍या माणसाने पोलिसांना फोन करून प्रसादला त्यांच्या ताब्यात दिले. प्रसादची जमानत द्यायला कोणीही न आल्यामुळे तो गेले चार दिवस पोलिसांच्या कोठडीत पाहुणचार घेत होता.
प्रणोतीने मन घट्ट केले व प्रसादची जमानत न देता ती सरळ घरी आली. प्रसादबद्दलच्या सार्‍या अपेक्षा फोल ठरल्या होत्या. आता तिला फक्त प्रज्ञासाठीच जगायचे होते. प्रसादच्या गैरहजेरीचे पटेल असे कारण प्रज्ञाला सांगून तिने आपल्या हृदयातून प्रसादचे नाव कायमचे बाद केले होते.
प्रणोतीच्या जीवनाची वाटचाल एका निश्‍चित मार्गावर चालू होती. प्रणोतीने स्वतःला परिस्थितीनुरूप बदलले होते. आता ती एक मुळमुळीत जीवन जगणारी सामान्य स्त्री नव्हती तर येणार्‍या प्रत्येक संकटाला समर्थपणे तोंड देणारी एक स्वाभिमानी स्त्री होती. काळानुरूप प्रज्ञा मोठी होत होती. प्रज्ञाने देखील आईची कुतरओढ पाहिली होती. वयाच्या मानाने ती विचारांनी व कृतींनी जास्तच प्रौढ झाली होती. आपल्या वडिलांबद्दल तिने बाहेर खूप ऐकले होते पण ते तिने स्वतःच्याच मनात ठेवले. प्रसादला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली हे तिला बाहेरच्या लोकांकडूनच समजले होते पण ती गप्प राहिली.
दिवस आपल्या गतीने जात होते. प्रज्ञा पदवीधर झाली व तिला नोकरीदेखील लागली. घराचे कर्ज चुकते झाले होते. त्यामुळे डोक्यावरचा भार हलका झाला होता. या दहा वर्षात प्रसादची काहीही चांगली वाईट वार्ता समजली नव्हती. प्रणोतीने देखील त्याला फारसे महत्त्व दिले नाही. योग्य वेळी योग्य संधी साधून तिने प्रज्ञाला प्रसादविषयी सारे काही सांगितले होते.
“आईऽ ए आई! अगं उठ ना! सकाळचे सात वाजले आहेत. तरी तू अजून झोपलीस आहेस. अग तू तयार होऊन टेबलवर ये. तोपर्यंत मी चहाचं बघते.” प्रज्ञाच्या हाकेने ती खडबडून जागी झाली. आज तिला उठायला बराच उशीर झाला होता. आपण रात्री आपल्या भूतकाळात किती वेळ रमलो होतो व आपणाला कधी झोप लागली हे कळलेच नाही. पण एक मात्र खरे की, प्रज्ञाच्या आवाजात रात्रीची कटुता व नाराजी नव्हती. चेहर्‍यावर निरागस भाव होते. ती समाधानाने उठली व चहाच्या टेबलाकडे गेली.
प्रणोतीचा नोकरीचा आज शेवटचा दिवस होता. तिच्या आयुष्याची दगदग आज थांबणार होती. ती आता गृहिणी म्हणून राहिलेले जीवन जगणार होती. एक आई व पत्नी म्हणून तिने तिची सारी कर्तव्ये पार पाडली. आता ती संसारव्यापातून मोकळी झाली होती. तिला आता प्रतीक्षा होती सुखाने मरण येण्याची. ती संध्याकाळ प्रज्ञा व तिने मजेत घालवली.
प्रज्ञाच्या लग्न न करण्याच्या निर्णयानंतर पुन्हा प्रणोतीने तो विषय तिच्यासमोर काढला नव्हता. जे वाण तिने प्रज्ञाचे जीवन सार्थकी व सुखी करण्यासाठी घेतले होते ते वाण आता पूर्ण झाले होते. आता ते वाण आईची सेवा करत प्रज्ञाला पूर्ण करायचे होते.

Share this article