Close

सुवर्ण महोत्सव (Short Story: Suvarna Mahotsav)

- विनायक रामचंद्र अत्रे


आमची आदर्श सोसायटी ही मूळची गरीब नवाजांची. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे चार मजली उद्वाहन नाही. उद्वाहन ही तेव्हा चैन होती. आर्थिक विवंचना पाचवीला पुजलेल्या. तेव्हा सोसायटी बांधली म्हणजे गंगेत घोडे न्हाले. सोसायटीची देखभाल नावाची चीज असते हे कोणाच्या खिजगणतीतही नसायचे!
आमच्या आदर्श सोसायटीचा सुवर्ण महोत्सव करायचा, अशी कल्पना आमच्या सोसायटीचे सचिव श्री. किशोरकुमार यांनी मांडली. त्यानिमित्ताने सोसायटीची डागडुजी होईल, रंगरंगोटी करता येईल हा त्यांचा मूळ उद्देश.
श्री. किशोरकुमार हे भुरटे ठेकेदार आहेत. म्हणजे सोसायटीतले लोक तसे म्हणतात. भुरटे चोर नव्हे तर ते भुरटे काम करणारे म्हणजे, प्लंबिंग, रंगकाम, प्लास्टरिंग, कंपाउंड भिंती, खिडक्या, दरवाजे, लोखंडी पिंजरे, गटारे, फूटपाथ अशी भुरटी कामे करतात म्हणून. पण या जोरावर किशोरकुमार मात्र स्वतःला मोठे बिल्डरच समजतात. या कामांमुळे त्यांची नगरपालिकेत चांगली ओळख आहे. त्याचा फायदा सोसायटीला मिळतो हे एक कारण आणि फुकटचा रुबाब करायला मिळतो, म्हणून ते सोसायटीचे आजीव सचिवच आहेत. नाहीतरी सगळ्या सोसायट्यांत सचिव, चेअरमन, मॅनेजिंग कमिटी मेंबर म्हणून कुणी बळीचा बकरा बनायला तयार नसतेच. त्यामुळे श्री. किशोरकुमार हे आमचे स्वयंभू सचिव!
असो! आमची आदर्श सोसायटी म्हणजे सहकारी गृहनिर्माण संकल्पना जेव्हा नुकतीच मूळ धरू लागली होती तेव्हाची. त्या काळात तो चाळींना पर्याय होता. त्यावेळी अशा सोसायट्या ह्या बहुधा कनिष्ठ मध्यम उत्पन्न असणार्‍यांना घरबांधणीसाठी पर्याय होता. मुंबईतल्या दाट लोकवस्तीमधून त्यांना बाहेर काढणे आणि मोक्याचा जागा लाटणे हा आतला हेतू. आता मात्र उच्च उत्पन्न गटातील मंडळी सुद्धा पंचतारांकित सोसायट्यांतून राहणे पसंत करतात.काळाचा महिमा किंवा मजबुरी. असो!
आमची आदर्श सोसायटी ही मूळची गरीब नवाजांची. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे चार मजली म्हणजे उद्वाहन नाही. उद्वाहन ही तेव्हा चैन होती. आर्थिक विवंचना पाचवीला पुजलेल्या. तेव्हा सोसायटी बांधली म्हणजे गंगेत घोडे न्हाले. सोसायटीची देखभाल नावाची चीज असते हे कोणाच्या खिजगणतीतही नसायचे! परिणाम स्वरूप सोसायटीच्या संडास, बाथरूमच्या पाइपांना कधी भोके पडली आणि त्यातून वडा-पिंपळाच्या अक्षय वृक्षांनी कधी मुळं धरली ते लक्षात घेणे कोणालाही जरुरीचे
वाटले नाही.
एका मिटींगमध्ये किशोरकुमारांनी ही गोष्ट पुढे मागे फार गंभीर धोका देऊ शकते ही बाब लक्षात आणायचा प्रयत्न केला, तर आमच्या सोसायटीतले वास्तुतज्ञ श्री. भूलथापे यांनी पुरातन वास्तुशास्त्राचा हवाला देत, अशी झाडे अवतीभवती असणे हे शुभ लक्षण आहे, असा सल्ला दिला. तसेच दुसरे एक अध्यात्म गुरू
श्री. निद्रानंद यांनी पिंपळाचे झाड तोडू नये. त्यात ईश्‍वरी वास्तव्य असते, अशी माहिती दिली. त्यामुळे त्या
वड-पिंपळांना अभय मिळून त्यांची वाढ आता गच्चीपासून तळापर्यंत पसरली असून आमची सोसायटी अलीकडे बोरोबुदूर येथील शिवमंदिराच्या अवशेषांसारखी दिसू लागली आहे. भिंतींना मोठे मोठे तडे गेले असून वडपिंपळावरच्या देवदेवता आपल्या घरातच मुक्काम ठोकावयास येतील की काय या शंकेने सोसायटीचा सुवर्णमहोत्सव साधून त्यांचे सन्मानाने विसर्जन करावे, ही किशोरकुमारांची कल्पना सर्वांना पसंत पडली. आधीच वन बीएचकेच्या अपुर्‍या जागेत देवांचा मुक्काम परवडण्यासारखा नव्हता.
सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीचे नावही बदलावे असे बर्‍याच सदस्यांना वाटत होते. अलीकडे सोसायट्यांना ग्रीनवूड पार्क, माउंटन हाइट्स, पार्क अव्हेन्यू, रिजन्सी पार्क अशी हायफाय नावे ठेवतात. त्यात आपले आदर्श नाव फार जुनाट वाटते. म्हणून नामांतराचा ठरावही पास झाला. किशोरकुमारांनीही नेहमीप्रमाणे नामांतर ही काही सोपी गोष्ट नाही. इमारतीवरचे नाव पुसून नवे नाव लिहिण्याएवढे ते सहज नाही तर त्यासाठी कागदोपत्री सर्व व्यवहार पुरे करावे लागतात आणि त्यासाठी बराच खर्चही करावा लागेल. ही वस्तुस्थिती आणि महापालिकेने नुकताच लागू केलेला मालमत्ता कर, यामुळे खर्चाचा आकडा कसा फुगेल हे सांगताच नामांतराचा फुगा फुटला!
हरदासाचे गाडे मूळ पदावर यावे तसे सोसायटीचे सुवर्ण महोत्सवाचे गाडे मूळ पदावर आले. कोणताही ठराव करा पण पैशाचे नाव काढू नका हा सोसायटीचा मराठी बाणा असल्यामुळे सुवर्ण महोत्सव रद्द करून थेट हिरक महोत्सवच करावा असा सूर निघाला.
“तुमचे म्हणणे खरे आहे. सुवर्ण महोत्सवाऐवजी हिरक महोत्सव करावा ही कल्पना फारच नामी आहे. पण त्यात एक अडचण वाटते,” सोसायटीचे चेअरमन हिरे म्हणाले.
“अडचण? ती काय?” किशोरकुमार.
“किशोरकुमार, अहो हिरक महोत्सव पंचाहत्तर वर्षांनी करतात. तोपर्यंत आपण जगतो का मरतो हा प्रश्‍न आहे. शिवाय सोसायटीची सध्याची बोरोबुदूर अवस्था पाहता तोपर्यंत इथे दंडकारण्य माजेल असे वाटते. त्यामुळे करायचा असला तर सुवर्ण महोत्सवच करू. म्हणजे याचि देही याचि डोळा पाहता तरी येईल.” हिरे.
“सुवर्ण महोत्सव करा नाहीतर हिरक महोत्सव, पण जास्तीचे पैसे मागू नका. प्रत्येक मिटींगमध्ये पैसे वाढवायला काहीतरी निमित्त शोधू नका.” वायफळ बाई.
“वायफळ बाई, अहो पैसे मागतो ते काय माझ्या घरच्या कामासाठी? सोसायटीची अवस्था पाहताय ना? त्या निमित्ताने काहीतरी डागडुजी होईल तर तुम्ही वाट का लावताय?”
“किशोरकुमार, मग फक्त तेवढेच करा. ही सुवर्ण महोत्सवाची फोडणी कशाला?”
“वायफळ बाई, अहो आपण सगळे एकत्र राहतो. कधीतरी कोणत्या तरी निमित्ताने एखादे स्नेहसंमेलन व्हावे असे नाही वाटत तुम्हाला? मग सोसायटी कशाला म्हणायचे?”
“किशोरकुमार, सोसायटीच्या आवश्यक त्या डागडुजीसाठी काय लागेल तो निधी आपण जमा करू. सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी माझी,” सोसायटीचे एक हरहुन्नरी सभासद श्री. गुंडाळे यांनी ठराव गुंडाळला. सुवर्णमहोत्सवाची माळ गुंडाळ्यांच्या गळ्यात मारून किशोरकुमारांनीही सुवर्ण महोत्सवाचा प्रस्ताव पास करून घेतला.
गुंडाळ्यांनी स्थानिक वृत्तपत्रात एक छोटी जाहिरात दिली.
आदर्श सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त काव्य वाचन स्पर्धा. कवींनी संपर्क साधावा. श्री. गुंडाळे. कार्यवाह ः फोन नं. प्रवेश मर्यादित. गुंडाळ्यांकडे विचारणा करणारे फोन वर फोन.
सुवर्णमहोत्सव थाटात साजरा झाला. सोसायटीच्या चौकात मोठमोठ्या सतरंज्या टाकून प्रेक्षक बसलेले. स्थानिक कलावंतांचे करमणुकीचे भरगच्च कार्यक्रम. अगदी आजी-आजोबांसह. गाण्यांची अंताक्षरी वगैरे आणि शेवटी एक टेबल खुर्ची त्यावर तांब्या भांडे, चार गुलाबाची
फुले आणि अध्यक्ष म्हणून गुंडाळे असा काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला. साठ-सत्तर कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रम चांगला दोन तास रंगला. सोसायटीच्या सभासदांना कविता फुकटात ऐकायला मिळाल्या.
प्रत्येक कवीला स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल एक छापील प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावर एका प्रथितयश कवीची सही पण (छापील) होती. गुंडाळ्यांनी ती एका रद्दीवाल्याकडून पैदा केली होती. प्रमाणपत्रावर सहभागी कवींनी स्वतःच आपली नावे टाकून घ्यावी अशी गुंडाळ्यांनी एक प्रेमळ सूचना केली होती. म्हणजे नावे घालण्याची ब्याद परस्परच मिटली.
जवळपास साठ, सत्तर कवी, त्यांचे आप्त मित्र, सोसायटीतील मंडळी असा भरपूर प्रेक्षकवर्गही लाभल्यामुळे कवी खूष होते. आदर्शचे सभासदही खूष होते. प्रत्येक सहभागी कवी कडून नाममात्र प्रवेश शुल्क म्हणून प्रत्येकी वीस रुपये घेऊन गुंडाळेंनी माफक निधीही जमा केला होता. त्यातूनच कवी
संमेलनानंतर सभासदांसाठी अल्पोपहारही ठेवला होता.
आता दरवर्षी आदर्श कवी संमेलन भरविले जाते.

Share this article