‘स्त्रीच्या जातीला इंजिनिअरचं, कष्टाचं काम पेलवणार नाही.’ घरातील कामं म्हणजे विश्रांती आहे? वडील म्हणाले, ‘तू इंजिनिअरीण हो. मी तुझ्यासाठी इंजिनिअर नवरा शोधतो.’
सरिता शांत पण ठाम आवाजात राघवला म्हणाली, मी रोहनला इंजिनिअर म्हणजे इंजिनिअरच करणार. बापापेक्षा मुलावर आईचा अधिकार नऊ महिन्यांनी जास्त आहे! मलाच इंजिनिअर व्हायचं होतं. पण माझ्या वडिलांनी मोडता घातला. काय तर म्हणे, ‘स्त्रीच्या जातीला इंजिनिअरचं, कष्टाचं काम पेलवणार नाही.’ घरातील कामं म्हणजे विश्रांती आहे? वडील म्हणाले, ‘तू इंजिनिअरीण हो. मी तुझ्यासाठी इंजिनिअर नवरा शोधतो.’
रोहन आईची ही वाक्यं तो शाळेत गेल्यापासून आजपर्यंत, म्हणजे प्राथमिक शाळेतील चार वर्षं व नंतर माध्यमिक शाळेतील सात वर्षं अशी अकरा वर्षं ऐकत होता. आईच्या या बोलण्याला उत्तर म्हणून बाब पिढीजात वकिली विषयाची महती गात व विचारत, पण मी वकील आहे, इंजिनिअर नाही. त्यामुळं तू वकिलीण झालीस, इंजिनिअरीण नाही. ती कशी काय? माशी कुठं शिंकली? लग्नापूर्वी तुझ्या वडिलांना, तुला मी वकील आहे हे माहीत होतं.
राघव, तुझे वडील नानासाहेब मोने प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या हाताखाली तूही वकील होऊन काम करत होतास. तुमचा बंगला होता. नानासाहेबांची व तुझी स्वतंत्र कार होती. तू एकुलता एक मुलगा. माझे बाबा म्हणाले, ‘बंगला, करा मिळवायला इंजिनिअरला कितीतरी वर्षं खपावं लागतं. राघव मोनेकडं आताच सर्व आहे, म्हणजे तो इंजिनिअरच्या वरचा आहे. हे स्थळ मिळालं तर तुझं कल्याण होईल.
तुझं कल्याण झालं का?राघवनं विचारलं.
माझं झालं. तुझं?
राघवनं उत्तर दिलं, माझं कोटकल्याण झालं. भागवतांकडच्या लग्नात माझ्या आईनं तुला पाहिलं होतं. त्या लग्नात तू गीतरामायणातील, निरोप कसला माझा घेता। जेथे राघव तेथे सीता।्। हे गाणं गाऊन पुरा लग्नमंडप भारवून टाकला होतास. आईनं तुझ्याबाबत चौकशी केली. तिथंच आई तुझ्या आईशी बोलली. आई घरी आली व मला म्हणाली,
‘राघव, मी तुझ्यासाठी सीता शोधली आहे. बघू या, कसं काय घडतं ते?’
तुझ्या वडिलांनी आमची चौकशी केली. ‘आपल्याला मागणी घातली आहे’ हे समजल्यावर तुला धन्य धन्य वाटलं म्हणे! तू हो म्हणालीस.’
पण राघव, तू का हो म्हणालास?
सरिता, मी मातृभक्त आहे. आईची इच्छा महत्त्वाची. आईनं तुला लग्नमंडपात गायलेलं गाणंच पुन्हा म्हणायला सांगितलं. तुझा गोरा, गाता, गोड गळा मला आवडला. त्या गळ्यातून वर्षानुवर्षं, ‘मी रोहनला इंजिनिअर करणार’ हे वाक्य तू मला ऐकवतेस, तुझा गळा आवडतो, हे वाक्य मात्र त्रासदायक वाटतं.
म्हणजे लग्नापूर्वी तू फक्त माझा गळा पाहिलास! माझे दाट, काळे, मऊ केस पाहिले नाहीस?
नाही ना! म्हणून तर लग्नानंतर आजपर्यंत म्हणजे गेली कितीतरी वर्षं तुझ्या केसाशी खेळतो आहे. लग्नाच्या आधी फक्त गोड गळाच पाहिला होता. गळ्याची एक स्पेशॅलिटी आहे. आजकाल सर्वांच्या घरी टीव्ही आहेत. पण वीज गेली की टीव्ही बंद, चित्रगीते बंद!
का? इनव्हर्टर लावून घ्या. वीज गेली की इनव्हर्टर वीज देतो.
खरं सांगू का? मला तुझ्या गळ्यातील आवाज व गळा खूप आवडतो. म्हणून मी लाडीगोडी लावत तुझ्यापाशी येतो व गाणं म्हण असं विनवतो.
आता मीही खरं सांगते. मुळात मला गीतरामायणातील गाणी गुणगुणायला आवडतात, तुझी लाडीगोडी त्याहून जास्त आवडते. तू लाडीगोडी करत राहा. गळ्याला स्पर्शही करत जा.
सरिता, मी तुझ्या गळ्याला, खळी पडणार्या गालाला, चमकदार कानांच्या पाळ्यांना स्पर्श करीन. पण माझी एक अट आहे.
अट मंजूर! सांग, तुझी अट सांग.
सरिता, रोहनला इंजिअरि करायचा हट्ट तू सोड. मी त्याला वकीलच करणार. त्याचे आजोबा वकील होते. मी वकील आहे. तोही वकील होणार. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. रोहनला दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळणारच. विद्यापीठानं पाच वर्षांचा नवा अभ्यासक्रम चालू केला आहे. थेट एलएलबी पदवी देणारा हा नवा अभ्यासक्रम रोहनला मी देणार. तू मान्यता दे. हीच माझी अट.
गळ्यातून सरितानं गोड आवाज न काढता कर्कश निर्धार व्यक्त केला, यापुढं मला तुझी लाडीगोडी नको. माझ्या गळ्याला स्पर्श करू नकोस. मी एकही गाणं मनातसुद्धा गुणगुणणार नाही. मी रोहनला इंजिनिअर म्हणजे इंजिनिअरच करणार. तुझ्याशी लग्न केलं. माझं कल्याण झालं. पण मी रोहनचं अकल्याण होऊ देणार नाही.
आपल्या आईवडिलांचे भांडणाचे हे संवाद वर्षानुवर्षे ऐकून रोहन वैतागला होता. एरवी आईचा शब्द तत्परतेनं ऐकणारे बाबा आपल्या शिक्षणाच्या मुद्यावर आले की कट्टर अतिरेकी का होतात?
रोहन, तुला काय व्हायचं आहे? हा प्रश्न आई व बाबा कधीही आपल्याला कसे विचारत नाहीत याचं रोहनला आश्चर्य वाटे व समाधानही वाटे. त्याला आई व बाबा दोघेही प्रिय होते. त्याच्या भावी व्यवसायावरून. दोघात होणारे मतभेद व भांडणे तशी श्रवणीय होती. दोघांनी त्याचं मत विचारलं असतं तर त्याची पंचाईत झाली असती. आपलं उत्तर एकालाही नापसंत पडता कामा नये. कारण आपल्याला दोघेही हवेत.
दहावीचा निकाल लागला. रोहनला भरघोस गुण मिळाले. कोणता कोर्स निवडायचा? सायन्स कोर्स निवडून पुढे इंजिनिअरिंगला जायचं का वकील व्हायचं? दोघांनी रोहनला विचारलं. रोहन नम्रपणे म्हणाला, मला तुम्ही दोघेही आवडता. तुम्ही दोघांनी मिळून माझ्यासाठी एकच व्यवसाय - पूरक अभ्यासक्रम निवडा. मी तो पुरा करीन किंवा .
किंवा काय? सरितानं विचारलं.
आई, आपण निर्णय दैवावर सोडू. चिठ्ठ्या टाकू. वर्षानुवर्षं तुम्ही या विषयावर वाद घालत आहात. एकमत होणं अशक्य आहे.
सरिता व राघव यांनी दैवाचा निर्णय स्वीकारायचं कबूल केलं.
रोहननं तीन चिठ्ठ्या केल्या. एका चिठ्ठीवर होतं, वकील, दुसरीवर इंजिनिअर व तिसरीवर मला हवा तो कोर्स.
रोहननं तीन चिठ्ठ्या आईबाबांना दाखवल्या, खिशात टाकल्या, हात मोकळे केले व तो देवापुढे उभा राहिला. देवाला नमस्कार करून, त्यानं खिशातील चिठ्ठ्या जमिनीवर टाकल्या. तो आईला म्हणाला, आई, मला व बाबांना तू जेवू घालतेस. तू अन्नपूर्णा आहेस. चिठ्ठीत काय येईल हे महत्त्वाचं नाही. तू चिठ्ठी उचलणं हे महत्त्वाचं आहे. तुझ्या आशीर्वादानं चिठ्ठीत जे काम माझ्या वाट्याला येईल त्यात मी यशस्वी होईन.
सरिता या आई खूष झाल्या. त्यांनी एक चिठ्ठी उचलली. चिठ्ठीत वकील निघालं. रोहन वडिलांना म्हणाला, बाबा, मी यशस्वी वकील होणार हे नक्की. पण मला यश मिळणार ते तुमच्या हाताखाली पदवी मिळवून, व्यवसाय करणार म्हणून नाही; केवळ आईनं वकील ही चिठ्ठी उचलली म्हणून!
बरं तर बरं, आई व बाबा या दोघांनाही समजलं नाही की रोहन या हुषार पोरानं झब्ब्याच्या उजव्या खिशात तीन मूळ चिठ्ठ्या टाकल्या होत्या व नंतर डाव्या खिशातून तीन चिठ्ठ्या काठून त्या जमिनीवर टाकल्या. या तीनही चिठ्ठ्यांवर रोहननं वकील असंच लिहिलं होतं. आईला न दुखवता रोहननं स्वतःला पाहिजे ते मिळवलं होतं. अशी आईचा सन्मान राखणारी लबाडी क्षम्य, नव्हे स्तुत्य आहे!
रोहननं शिक्षण पुरं केलं. वडिलांच्या हाताखाली त्यानं वकिलीचा व्यवसाय तीन वर्षं उत्तम सांभाळला.
राघव म्हणाले सरिता, तुझा बेटा बापसे सवाई निघाला. सरीताबाईंना सून हवी असं वाटू लागलं. आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सरीता या वकीलीणबाई एका लग्नाला गेल्या होत्या. लग्नात त्यांनी वासंती या तरुणीचं, आकाशासी जडले नाते धरणीमातेचे । स्वयंवर झाले सीतेचे ।्। हे प्रसंगोचित, तेही गीतरामायणातील, त्यांच्या आवडीचं, गाणं ऐकलं. वासंती दिसण्यात मोहक होती. तिचा आवाजही गोड होता. सरिताबाईंनी पुढाकार घेऊन वासंतीच्या आईवडिलांना शोधलं व मी सरिता मोने. राघवसाहेब मोने वकिलांची पत्नी. माझा मुलगा रोहन हाही वकील आहे. अशी आपली माहिती दिली.
वासंतीचे वडील म्हणाले, मोनेसाहेबांना कोण ओळखत नाही?
वासंतीच्या आई म्हणाल्या, तुम्ही महिलामंडळाच्या अध्यक्ष होता. मी तुम्हाला ओळखते.
सरिताबाई म्हणाल्या, माझा मुलगा रोहनसाठी मी मुलगी पाहते आहे. तुमची मुलगी वासंती मला रोहनसाठी छान वाटते. तुम्ही चौकशी करा. रोहनचं स्थळ योग्य वाटलं तर रोहन व वासंती यांना एकमेकांना भेटू द्या.
रोहन व वासंती परस्परांना हॉटेलमध्ये तीन वेळा भेटले. त्यांची मैत्री झाली. दोघांनी आपल्या आपल्या घरी आईवडिलांना सांगितलं, आम्ही लग्न करू.
लग्नाचे तपशील ठरवून व बैठक आनंदात संपवून, वधूवर पक्ष खुर्च्या सोडून उठले. तेवढ्यात रोहन म्हणाला, थांबा. एक करार करणं जरुरीचं आहे.
करार? कसला करार? वासंतीच्या स्वरात नाराजी होती.
रोहन अजीजीनं म्हणाला, वासंती, करार जरूराचा आहे. तू होकार दे. आपली मुलं मोठी झाल्यावर त्यांनी पुढं काय व्यवसाय करायचा हे मुलांनाच ठरवू द्यायचं. त्यात आपण ढवळाढवळ करायची नाही. आमच्या घरी मी एकुलता एक होतो. मी इंजिनिअर व्हावं का वकील यावर माझे आईवडिल भांडभांड भांडले. आपल्याला तीन-चार मुलं होणार! मग? वासंती हसत, लाजत म्हणाली, मला हा करार मान्य आहे.