Close

अजब शक्कल (Short Story: Ajab Shakkal)

  • विनायक शिंदे

  • ध्यानीमनी नसताना बाबांचा जुना मित्र जगन ढमाले देवासारखा धावून आला. त्यानेच हे शंकरचे नात्यातले स्थळ आणले. तो शंकर कसाबसा दहावीपर्यंत शिकलेला होता. त्यात त्याची फिल्मसिटीतली काळवेळ नसलेली ’स्पॉटबॉय’ची नोकरी! मुंबईच्या पोरी त्याला वार्‍यावरही उभे करीत नव्हत्या. त्याची आई मुलाच्या लग्नाच्या चिंतेने अर्धी झाली होती. शंकर दिसायला सर्वसामान्य होता. शकुंतलाला पाहताक्षणीच आवडला नव्हता.

आजूबाजूला हा हा म्हणता 25 मजल्यांचे तर कुठे 19 मजल्यांचे थर कुठे आभाळाशी स्पर्धा करणारे गगनचुंबी टॉवर्स शांता मावशी व पांडू तात्या यांच्या नजरेसमोर गेल्या दहा वर्षांत जागोजागी दिसायला लागले आणि श्रीमंतानी, प्रतिष्ठितांनी कायम नाके मुरडलेला तो स्लम विभाग कात टाकलेल्या सापासारखा चकचकीत दिसायला लागला. क्वचित एखादी आलिशान कार त्या रस्त्याने जाताना पूर्वी दिसायची, तिथे बिल्डरनी सुसज्ज पार्किंग केल्यामुळे त्या भव्य टॉवर खाली उंची, इंपोर्टेड कारची रेलचेल दिसायला लागली. त्या रोेडला कधी काळी दिसणारे भिकारी, नंदी बैलवाले, डोंबार्‍याचा खेळ करणारे, आता हवेत अदृश्य झाल्यासारखे नाहीसे झाले होते.
अचानक एखाद्या गरिबाला लॉटरीचे 25 लाखाचे बक्षीस लागून त्याचे भाग्य उजळावे तसेच काहीसे त्या गल्लीचे झाले होते. जगात सर्वत्र सुधारणांचे वारे वाहायला लागले होते. त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने अनेक सुधारणांचे वारे या ’अंधार गल्ली’चे झाले होते. पूर्वी कधी काळी त्या विभागात राहणारा माणूस चुकून त्या बाजूला आला तर समोर आपण काय पाहतो आहे… हे सत्य आहे की स्वप्न आहे. इतका विलक्षण बदल तिकडे झाला होता. बरोबर त्याच्यासमोर आगबोट चाळ गेली शंभर वर्षे तिथे ठिय्या मारून उभी होती. काही जणांच्या चार पिढ्या त्या चाळीत वास्तव्य करून गेल्या होत्या. तिच्या पुढे आणि पाठीमागे मुबलक जागा होती. कोणीतरी म्हणेल लबाड, बनेल व प्रेताच्या टाळूवरले लोणी खाणार्‍या बिल्डरांची या सोन्याची कोंबडी देणार्‍या या जागेवर नजर कशी पडली नाही? तर रानात पडलेल्या मेलेल्या गुरावर जशी आकाशात गिधाडे घिरट्या घालतात तसे बिल्डरांचे दलाल, फंटर, चमचे गेले कित्येक महिने त्या चाळीचे लाकडी दादर झिजवीत होते, पण चाळीचे एकमत होते. आमची चाळ कोणालाही म्हणजे बाजार बुणग्या बिल्डरांना द्यायची नाही. ते सुधारणेच्या नावाखाली टोलेजंग इमारती बांधतात व दामदुप्पट मलिदा खातात व गरीब भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसतात. त्यांनी आपल्या चाळीवर मोठा बॅनर लावला होता. ’बिल्डरना या चाळीत यायला मनाई आहे. अपमान झाल्यास आम्ही जबाबदार नाही.’
लाकडी दादरावरून उजव्या हाताला शकुंतलाची खोली होती. दोन वर्षांपूर्वी शंकरशी तिचे लग्न झाले होते. तिचे वडील गेली पाच वर्षे तिच्या लग्नासाठी कसून नेटाने प्रयत्न करीत होते; पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. तिला सर्वजण लाडाने शकू म्हणत. ती दिसायला गोरीपान, धारदार नाक, दाट काळेभोर केस शिवाय शेलाटा बांधा, चांगली बारावीपर्यंत शिकलेली. कोल्हापुरातली मुले तिच्या शकुंतला या जुनाट नावाला नाके मुरडीत. ते म्हणत, ’ही शकू तर तिला एखादा सदोबा नाहीतर पांडूच बरा दिसेल. त्याच्याशीच लग्न लावून द्या. आमच्याकडे नाय जमायचे.’ ग्रामीण भागातल्या वरांची ही तर्‍हा तर मुंबईचे सुधारलेले सुशिक्षित, मोठे पगारदार तरुण म्हणायचे - ’आम्हाला शहरातली मुलगी हवी. हिला दादरच्या गर्दीत सोडले तर चुकत चुकत ही भुलेश्‍वरला जायची. त्यापेक्षा नकोच ते गावंढळ स्थळ!’ या अशा खवचट आणि लागट बोलणार्‍या लग्नाळू तरुणांमुळे शकुंतलाचे लग्न लांबत चालले होते.
ध्यानीमनी नसताना बाबांचा जुना मित्र जगन ढमाले देवासारखा धावून आला. त्यानेच हे शंकरचे नात्यातले स्थळ आणले. तो शंकर कसाबसा दहावीपर्यंत शिकलेला होता. त्यात त्याची फिल्मसिटीतली काळवेळ नसलेली ’स्पॉटबॉय’ची नोकरी! मुंबईच्या पोरी त्याला वार्‍यावरही उभे करीत नव्हत्या. त्याची आई मुलाच्या लग्नाच्या चिंतेने अर्धी झाली होती. शंकर दिसायला सर्वसामान्य होता. शकुंतलाला पाहताक्षणीच आवडला नव्हता. ती म्हणाली, ”बाबा, मला नाय लगीन करायचं याच्याशी.”
उत्साहात लग्नाच्या तयारीची स्वप्ने ते पाहात होते आणि पोरगी ती स्वप्ने नकाराच्या अग्निकुंडात जाळून खाक करीत होती. मग मात्र त्यांच्या डोक्यात कुठल्यातरी मराठी सिनेमातले दृश्य स्पष्ट दिसले. ते हसत की रडत म्हणाले,”शकू तुला नाय करायचे लग्न… नको करूस. पण उद्या सकाळी तुझ्या बापाचे मेलेले तोंड पाहशील.“
वडील इतक्या हातघाईवर आलेले पाहून शकुंतला एकदम घाबरली व तिने पटकन् होय म्हणून टाकले. नंतर एका गोरज मुहूर्तावर शंकर व शकुंतला यांचे लग्न थाटामाटात पार पडले व ती नवर्‍यासह या आगबोट चाळीत राहायला आली. त्यालाच आता चांगली पाच वर्षे होऊन गेली होती. शंकरची आये रत्ना पहिली तिथेच राहायची. पहिली पहिली सुनेशी ती प्रेमाने वागायची. चार चौघीत सुनेचे कौतुक करायची पण शंकरच्या लग्नाला चांगली पाच वर्षे झाली तरी सुनेच्या पोटी संतान नाही, म्हणजे नक्कीच हिच्यात काहीतरी खोड असली पाहिजे, असा तिने सुनेबद्दल आपल्या मनाचा दूषित ग्रह करून घेतला. त्यात तिच्या गोरेगावच्या मोठ्या सुनेने पेट्रोल टाकून काडी ओढली. म्हणाली,“सासुबाई, शकुच्या बापानं एक फुटकी कवडी बी हुंडा दिला नाही आनी ही वांझोटी भाकड म्हैस तुमच्या गळ्यात बांधून तुम्हाला चांगलीच टोपी घातली हाय.” शकूची जाव नेहमीच आल्या गेल्याला - देवाला मनातल्या मनात शिव्या द्यायची. दहा वर्षांपूर्वीच ती लग्न होऊन आली होती. तिचा नवरा विष्णू गोदीत मुकादम होता. लग्नाच्या पहिल्याच वर्षी ती गरोदर राहिली व तिला पहिलाच मुलगा झाला होता आणि तिथेच तिचे नशीब फुटले होते. तिचा मुलगा जन्मताच मुका होता, शिवाय प्रकृती एकदम नाजूक. आईला काही दुःख द्यायचं बाकी राहिले होते म्हणून की काय त्याचे दोन्ही पाय एकदम बारीक काठीसारखे वाळके होते. त्यात अजिबात जीव नव्हता. त्याच्या रडण्याचा चमत्कारिक आवाज यायचा. त्याला आईच्या अंगावरचे आणि बाहेरचे दूध पचायचे नाही. पाजले की त्याला पाच मिनिटात जुलाब व्हायचे. बर्‍याच बालरोग तज्ज्ञांना दाखवले पण कोणीच त्या मुलाबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. माझ्या कर्माचे भोग आहेत, नायतर देव माझी सत्त्वपरीक्षा घेतोय म्हणून याला देवानं माझ्या पोटी जन्माला घातलं, असं म्हणून भारती - जाऊबाई धाय धाय रडायची. नवर्‍याला दोष द्यायची. तो या कानाने ऐकायचा आणि दुसर्‍या कानाने सोडून द्यायचा.
तो म्हणायचा, ”जैसी करनी वैसी भरनी. तुझ्या पापाची फळे हायत ही. आजपर्यंत तू कधी कुणाला चांगले म्हटले आहेस? माझ्या आईला आल्या आल्या हडळ म्हणालीस. भावाला पिंपळावरला मुंजा म्हणालीस, मला मातीचा पुतळा. तू तुझ्या सख्ख्या बहिणीला तरी कुठे सोडलेस? अंजनाने घरातल्या सर्वांशी वैर पत्करून प्रेम विवाह करून ती एका रात्री नात्यातल्या अशोक बरोबर पळून गेली. तेव्हा तिला तू वेसवा म्हणालीस. तिला म्हणालीस - आमच्या घराण्याला कलंक लावलास. बापाच्या तोंडाला काळं फासलंस. तुझं कधीच भलं होणार नाय. वर्साच्या आत तिचा नवरा वारला. ती विधवा झाली. तुझ्या तोंडात लावसट हाय. आता देवानं तुझ्या नशिबात हेच लिवलंय तवा आपलं नशीब समज आन जग तशीच, लोकांची उणी दुणी काढीत. त्या शकूकडं बघ… ती मनानं पाक हाय. उशिरानं का होईना देवानं तिच्या पदरात गोंडस बाळ टाकलं.”
”खबरदार, माझ्या म्होरं त्या गावंढळ शकूची तरफदारी करू नका. तुमची आई तिला भाकड म्हैस बोलायची. तुमची आय पन कमी न्हाय. हिथं राह्यले तर नातवाचं समदं करावं लागल म्हणून मुद्दामच वाठारला जाऊन बसली हाय भावाच्या संसारात तुकडं मोडीत… हिथं र्‍हायली आसती तर तिचे हात काय झडले असते…“
पुढचं काय ऐकायला लागू नये म्हणून तिच्या नवर्‍याने तिथून हळूच काढता पाय घेतला.
… आणि ती भयंकर बातमी त्या गोरेगावच्या मालवणकर रोडला वार्‍यासारखी पसरली. तिथल्या सीतासदन चाळीतल्या दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या भारती मोरे या बाईचा आठ वर्षाच्या मुलाला कपडे घेऊन भांडी देणार्‍या बोहारीण बाईने भर दिवसा पळवला. मुंबईत कुठे काय खूट झाले की तिथे फटदिशी बाहेर जायचे व कव्हर स्टोरी करणार्‍या मीडियावाल्यानी अख्ख्या मुंबईभर नव्हे तर ती बातमी अख्ख्या भारतात पसरवली. क्षणात प्रेसवाले, पोलीस सर्वजण लगबगीने त्या गोरेगावच्या सीतासदन या मध्यमवर्गीय चाळीकडे धावले. मंत्रालयातून त्यांना धडाधड फोन आले होते. गेली कित्येक वर्षे आली नव्हती, इतकी माणसे त्या दुर्लक्षित सीतासदन खाली जथ्याजथ्याने उभी होती. प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता. पूर्वी जी पब्लिकपासून गुप्त ठेवण्यात येत असे; तीच बातमी मोबाईलच्या कृपा प्रसादाने सर्वसामान्य लोकांना काही सेकंदात कळत होती.
इन्स्पेक्टर तावडेनी, हे कसे घडले? अशी विचारणा केल्यावर मुलाची आई भारती रडत रडत म्हणाली, ”काय सांगू साहेब, माझ्या कर्माची दुर्दशा, काल एक कपडेवाली बाई खालून ओरडत होती. कपडे द्या आणि भांडी घ्या. माझ्याकडे बरेच दिवसांपासून कपड्याचा ढीग पडला होता. मी अशा बोहारणीची वाटच बघत होते. म्हटलं देवानेच धाडले हिला. मी तिला वरती बोलावले. माझा आठ वर्षांचा पोरगा भिंतीला टेकून बसला होता. मी जुन्या कपड्यांचे बोचके तिच्या पुढ्यात टाकले. एक एक कपडा बाहेर काढून ती बारकाईने पाहत म्हणाली, वयनीसाब यवढ्यानं नाय भागायचं, आनखी काय असल तर बगा म्हंजी ही प्लास्टीकची बालदी देते तुमाला. म्हणून मी आत गेले तर ही माझ्या पाठोपाठ आत आली आणि मला काय उलगडा होण्याअगोदरच गुंगीचे औषध टाकलेला रुमाल माझ्या नाकावर दाबला. पुढचं काय झालं तेच मला कळले नाही. क्षणात मी बेशुद्ध पडून खाली कोसळले. तेवढ्यात त्या बाईने माझ्या निलेशला पळवले. आता मी काय करू?”
”तुमचा कोणावर संशय आहे का? कोणी तुमच्यावर सूड तर घेत नाही ना?”
”नाही, आमचा कोणावर संशय नाही. हा माझी एक धाकटी जाऊबाई आहे, शकुंतला. परेलला र्‍हाते आगबोट चाळीत. तिचं आणि माझं अजिबात पटत नाय.”
इन्स्पेक्टर तावडेनी पुनः पुन्हा सीसी कॅमेरा ट्रेस केला तर ती बाई त्यांना लगबगीने त्या मुलाला घेऊन गेली व सरळ एका अगोदरच ठरवून ठेवलेल्या टॅक्सीत जाऊन बसली. ती नंतर एवढ्या मोठ्या मुंबईत कुठे गेली असेल? आठ दिवसांपूर्वी सायनच्या एका मॅटर्निटी नर्सिंग होममधून एका तीन दिवसांच्या अर्भकाला पळवल्याची घटना ताजी असताना लगेचच ही घटना घडली होती. म्हणजे मुंबईत मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली की काय? आता समाज माध्यमावर परिणाम होणार व त्याचे सारे खापर आपल्या पोलीस खात्यावर फोडले जाईल. कदाचित आपल्या बदलीची ऑर्डरही निघेल या कुशंकेने तावडे साहेब मनोमनी धास्तावले. तेवढ्यात हवालदार शंकर सुतार पुढे येऊन म्हणाला,
”साहेब मला तर वाटते त्या मुलाची आई आपल्यापासून काहीतरी लपवते आहे.”
”मला पण नेमके तसेच वाटते आहे. मुलाच्या अपहरणाचे दुःख मला तिच्या चेहर्‍यावर दिसले नाही. ती नुसता द्यायचा म्हणून कबुली जबाब देत होती. तिला मुद्दामच आपल्या जावेला या केसमध्ये अडकवायचे आहे. आपण तिची भेट घेऊया. नक्कीच यातून काहीतरी छडा लागेल.”
आगबोट चाळीत ती भयंकर बातमी शकुंतलाच्या कानावर पोचली होती. आपली जाऊ भारती आपल्याला हमखास अडकवून गेल्या सात जन्मीचा सूड उगवणार याची तिला खात्री असल्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर तावडे व हवालदार सुतार तिच्या घरी आल्यावर तिला तितकेसे आश्‍चर्य वाटले नाही.
”शकुंतलाबाई मला तुमच्या जावेने तुमच्यावर संशय घेतल्यावर नाइलाजाने यावे लागले आहे.”
”नाही साहेब, त्यात तुमचा मुळीच दोष नाही. सरकारी कायद्याचा मी आदर करते.”
”समोर पाळण्यातल्या तीन चार महिन्यांच्या गोंडस बाळावर नजर फिरवीत तावडे म्हणाले, वा इतके छान गोंडस बाळ पाहिल्यावर बरे वाटते. तुमचाच ना?”


”होय, माझाच मुलगा. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्‍नाचे उत्तर आपसूक मिळाले असेल… इतका छान मुलगा माझ्या पदरी असताना तिचा रोगट आजारी - वाळक्या पायाचा मुलगा मीच काय पण कोणीही पळवणार नाही. जन्मापासून तो मुलगा आजारी आहे.”
”काय सांगता… ही माहिती त्या बाईने आम्हाला सांगितली नाही. तिने का असे केले असेल?”
”साहेब, नक्कीच इथे कुठे तरी पाणी मुरते आहे.” हवालदार सुतार हसत म्हणाले.
ते दोघे मग लगेचच तिथून निघाले.
अचानक तावडे साहेबाला काहीतरी आठवले. काही वर्षांपूर्वी रंगा-बिल्ला या जोडगोळीने मुंबईत टॅक्सी चोरून परस्पर विकून मोठा हैदोस घातला होता. त्यातला रंगा पळून जात असता पोलिसांच्या गोळीला बळी पडला होता. बिल्ला मागे राहिला होता. नुसत्या सेफ्टी पीनने तो गाडी चालू करायचा. तो कोणत्याही पार्किंगला लावलेली टॅक्सी रात्रीच्या वेळी काढायचा व मुंबईच्या जवळपासच्या शहरातून चोरट्या दारुची आयात करायचा. त्याचे वर्षानुवर्षे या धंद्यातले ठेकेदार ठरलेले असायचे. कर्मधर्म संयोगाने कल्याणचा एक खबर्‍या लक्ष्मण त्याने तावडे साहेबाना शहाडच्या विठ्ठल मंदिरासमोर बांधलेल्या बेकायदेशीर चाळीत बिल्ला एकटाच राहतो, याचा ठावठिकाणा सांगितला आणि त्याचे अवैध धंदे अजूनही चालू असल्याची खबर दिली. सकाळी पाचच्या सुमारास झोपेत असताना त्याच्या मुसक्या आवळल्या. सुरवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. तेव्हा नाइलाजाने त्याला पोलिसी खाक्या दाखवायला लागला. मग मात्र तो पोपटासारखा बोलायला लागला. त्याने सांगितलेली माहिती इतकी विलक्षण होती. तावडे साहेब व त्यांचे सहकारी चांगलेच हडबडले.
साखराबाई व भारती जाऊ (मुलाची आई) या लहानपणापासून कल्याणला राहात होत्या. त्यामुळे त्या एकमेकीला ओळखत होत्या. भारती लग्न होऊन गोरेगावला सासरी गेली. साखरी मात्र तिथेच बिल्डिंग कॉन्ट्रक्टरकडे पडेल ते काम करणार्‍या सुभाषच्या प्रेमात पडली व लवकरच त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली. लवकर सुभाषला वाईट मित्रांच्या संगतीने दारुचे भयंकर व्यसन लागले. तो मग दारू पिऊन घरात पडून असायचा. मग मात्र उपासमार होऊ नये म्हणून धुणी-भांडी करायची कामे स्वीकारली. अचानक तिच्या नवर्‍याचा आजार बळावला. डॉक्टर म्हणाले, नवरा जिवंत हवा असेल तर एक लाख रुपये त्याच्या उपचाराला लागतील. तिला नवर्‍याचे हाल पाहवेतनात. तिने कामे करीत असलेल्या शेटकडे पैसे मागितले. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, ”गोरेगावला जा भारतीकडे, तिच्याकडे भरपूर पैसा आहे. ती तुला सहज 1 लाख रुपये देईल.”
गोरेगावला ती भारतीचा पत्ता शोधीत गेली. तिने भारतीकडे हात पसरले आणि काय आश्‍चर्य ती लगेच एक लाख रुपये द्यायला तयार झाली; पण पुढे तिने तिला एक अट घातली, ती ऐकून साखरीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने कपाटात एक लाख रुपयांच्या नोटा काढून त्या साखरीच्या हातावर ठेवल्या.


”साखरे, नीट कान देऊन ऐक. हे तुझ्या कामाचे पैसे आहेत. त्या बदल्यात तू माझ्या या रोगट पोराला पळवून न्यायचे व माझ्या पाठी लागलेली ही पनोती तू कायमची घालवून टाक. त्याला कळव्याच्या खाडीत बुडवून खलास कर, पन ही ब्याद परत माझ्या घरला आली नाय पायजे. पुढे काय होईल ते मी सांभाळून घेईन. त्याबद्दल तू टेंशन घेऊ नकोस.”
आता पैसे तर मिळाले, म्हंजे माझा नवरा मरणाच्या दारातून परत येणार… पण इथून या पोराला पळवून कसे न्यायचे. मला एकदम बिल्लाचे नाव आठवले. तो दुसर्‍यांच्या गाड्या चोरून त्या नुसत्या पीनने उघडतो व त्याच टॅक्सीतून दारुची वाहतूक करतो. एकदा पोलीस त्याच्या मागावर असताना मीच खोटे बोलून त्याला पोलिसांच्या तावडीतून वाचवले होते. तेव्हापासून तो मला जाम मानतो. मी त्याला माझा प्लॅन सांगितल्यावर तो सुरुवातीला तयार होईना. तो म्हणाला,” पोराला मारले तर फाशीचा दोर कधी ना कधी आपल्या गळ्याला लागणार. त्यापेक्षा आपण त्याला खडवलीच्या अनाथ आश्रममध्ये ठेवूया. त्या पाषाण हृदयी मातेचे पुन्हा तोंड पाहायचे नाही. अगोदर ठरल्याप्रमाणे त्या मुलाच्या तोंडावर गुंगीचे औषध टाकलेला रुमाल दाबला. त्याबरोबर त्याची हालचाल थंडावली. दादरावर भारती स्वतः पहारा करायला उभी होती. मी त्या मुलाला मिठीत घेतले व अगोदरच चालू असलेल्या टॅक्सीत पळत जाऊन बसले. मग आम्ही रस्त्यात टॅक्सी मध्ये कुठेच थांबवली नाही. सरळ खडवलीच्या अनाथ आश्रमात नेऊन थांबवली. तिथले संचालक बाबा परनानंद यांना पोराच्या आईची कुटील करणी सांगितली. त्यांना त्या मुलाची दया आली व त्यानी लगेचच आश्रमात दाखल करून घेतला. लई उपकार झाले.”
”बिल्ला, साखराबाई तुम्ही दोघानी फार मोठी कामगिरी केली आहेत. तेव्हा तुम्हाला सोडून देतो. पण त्या मुलाच्या कपाळकरंट्या आईला मी कायद्याचा बडगा दाखवणारच.”
इन्स्पेक्टर तावडे रागाने म्हणाले.

Share this article