Close

फक्त एका हिट चित्रपटामुळे या अभिनेत्रीला मिळाला आहे ‘नॅशनल क्रश’चा टॅग (12th Fail Actress Medha Shankar Became Most Popular Actress In Imdb Rating List)

सध्या बॉलिवूडची एक अभिनेत्री नशीबवान असण्याचा अनुभव घेतेय. कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेतात. मात्र या मेहनतीला जेव्हा नशिबाची साथ मिळते, तेव्हा प्रसिद्धी आणि यश मिळवायला फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही. सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ ठरलेल्या एका अभिनेत्रीसोबत सध्या हेच घडलंय. या अभिनेत्रीचा चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक तर झालंच. पण हा चित्रपट जेव्हा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हा तिची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. या चित्रपटामुळे आता ही अभिनेत्री देशातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. तिच्या लोकप्रियतेनं शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणलाही मागे टाकलं आहे. इंटरनेट मूव्ही डेटाबेस म्हणजेच IMDb ने लोकप्रिय सेलिब्रिटींची आठवड्याभराची यादी जाहीर केली आहे. त्यात ही अभिनेत्री पहिल्या स्थानी आहे.

IMDb ने जारी केलेल्या यादीनुसार, १६ जानेवारीच्या आठवड्यात अभिनेत्री मेधा शंकर सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचली आहे. मेधा शंकरचा ‘12th Fail’ (बारावी फेल) हा चित्रपट जबरदस्त हिट झाला. डिस्ने प्लस हॉटस्टारवर या चित्रपटाला दमदार रेटिंग मिळाली आहे. IMDb च्या यादीत मेधानंतर दुसऱ्या स्थानी याच चित्रपटाचा मुख्य अभिनेता विक्रांत मेस्सी आहे. या दोघांनी मिळून टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीतील इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. यात शाहरुख खान, सलमान खान, प्रभास, दीपिका पादुकोण यांचा समावेश आहे.

‘बारवी फेल’ या चित्रपटानंतर सोशल मीडियावरही मेधा आणि विक्रांत यांची लोकप्रियता वाढली. गेल्या काही दिवसांत या दोघांच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण देशभरातील नेटकरी मेधाबद्दल सर्च करत आहेत. मेधाचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स अवघे १६ हजार होते. तोच आकडा आता लाखांमध्ये पोहोचला आहे.

मेधा शंकर ही अभिनेत्री आणि गायिकासुद्धा आहे. तिने दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. २०१९ मध्ये तिने ‘बेकम हाऊस’ या ब्रिटीश टीव्ही सीरिजमधून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर २०२१ मध्ये तिने ‘शादिस्तान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं.

(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Share this article