Close

फिटनेसचे 15 फायदे (15 Benefits Of Fitness)

नियमित व्यायाम करण्याचे काय फायदे होतात, ते जाणून घ्या आणि निरोगी राहा…


आपलं शरीर फिट आणि निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, हे वाक्य आजकाल प्रत्येक जण बोलत असतो; पण लक्षात कोण घेतो? अशी अवस्था आहे. कारण त्याचा अंमल फार कमी लोक करतात. अन् बोलणारा तर करतच नाही. शिवाय ‘काय करणार हो, वेळच मिळत नाही’, किंवा ‘कामाच्या ओझ्यापायी व्यायाम सुधरत नाही,’ असे बहाणे सांगितले जातात. तर काहीजण फुशारकी मारत सांगतात की, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी फिट आहे. मला व्यायामाची, वर्कआऊटची काय गरज आहे?’ बहाणेबाजांना विसरा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. अन् वर्कआऊट्स किती लाभदायक आहेत, ते बघा.

  1. कार्डिओवॅस्कुलर एक्सरसाइज, ज्याला शॉर्टकटने ‘कार्डिओ’ असं म्हटलं जातं, तो करण्याने आपल्या श्‍वसनमार्गाची क्षमता वाढते. श्‍वास मोकळा होतो. जेणेकरून अंगात ऊर्जा राहते.
  2. नियमित व्यायाम केल्याने हृदयाची स्पंदनं नीट चालतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. त्याचप्रमाणे मांसपेशी तंदुरुस्त राहतात.
  3. दररोज न चुकता व्यायाम केल्याने शरीरातील स्टॅमिना वाढतो. अन् आपण कामं जोमाने करू शकतो.
  4. व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तदाब नियंत्रित राहिल्याने हृदयास योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो आणि त्याचं कार्य सुरळीत चालतं.
  5. व्यायाम करण्याचा मोठा फायदा म्हणजे, रक्तामधील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात, त्याची पातळी कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत होते.
  6. व्यायामाने शरीरातील रक्तसंचार वाढतो. त्यामुळे सर्व अवयवांना योग्य तेवढा रक्तपुरवठा मिळतो. मेंदू उत्तम प्रकारे कार्यरत राहतो.
  7. आपला मेंदू कार्यक्षम राहण्यास व्यायामाची मोठी मदत मिळते. नवे ब्रेन सेल्स निर्माण होतात. त्याचप्रमाणे ब्रेन सेल्स एकमेकांशी जोडण्यात यश मिळतं.
  8. नियमित व्यायाम केल्याने शरीरात एन्डॉर्फिन्स नामक स्राव स्रवतो. हा स्राव मानसिक ताण कमी करतो.
  9. हृदय, मेंदू यांच्याबरोबरच व्यायामाने हाडांची बळकटीही होते. बोन मिनरल डेन्सिटी वाढते. त्यामुळे ऑस्टिरोपायसिस होण्याचा धोका कमी होतो.
  10. पाठदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींना व्यायामाने गुण येतो. मात्र अशा व्यक्तींनी कोणत्या प्रकारचे व्यायाम करावे, ते तज्ज्ञांकडून शिकून घ्यावं.
  11. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर टाइप 2 डायबेटिससारखे डिजनरेटिव्ह आजार बरे होतात.
  12. नियमित व्यायाम केल्यामुळे झोप चांगली येते. तसंच नैराश्य कमी होतं. ‘स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीन’मधील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्यायाम करणार्‍यांना चांगली झोप येते. आणि ते सकाळी जास्त ताजेतवाने असतात.
  13. व्यायामामुळे आत्मविश्‍वास वाढतो. शरीरातील शक्ती वाढते.
  14. व्यायामाने वाढत्या वयाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आपण अधिक काळ निरोगी आणि तरुण राहता.
  15. कित्येक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की, जे लोक शारीरिकदृष्ट्या फिट राहतात, त्यांचं आयुष्य वाढतं. त्यांच्यामध्ये अकाली मृत्यूची शक्यता कमी असते.

Share this article