Close

मराठी रंगभूमीवर ‘नथुराम’ विरुद्ध ‘नथुराम’ आमने सामने : प्रकरण न्यायालयात जाणार? (2 Marathi Plays On The Life Of Nathuram Godse Are Ready To Stage : Original Producer To Fight Against Sharad Ponkshe In Court)

मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे कृत्य 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या बहुचर्चित मराठी नाटकाच्या निमित्ताने घडत आहे, शीर्षकासह या नाटकाची संहिताच ढापण्याचा हा प्रकार घृणास्पद व निंदनीय आहे. प्रचंड मेहनत घेऊन, संशोधन करून दिवंगत जेष्ठ लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या लिखाणाचे व शीर्षकाचे श्रेय या नाटकाद्वारे अभिनेता म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तीनेच (शरद पोंक्षे यांचे नाव घेण्याची इच्छा नसल्याचे सांगत) करावे हे मराठी रंगभूमीसाठी शोभनीय नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडला जाईल आणि अनेक प्रतिभावंत नाटककारांचे श्रेय लाटण्याची परंपरा सुरु होईल अशी खंत निर्माते उदय धुरत व्यक्त करतात.

काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर प्रचंड वादग्रस्त ठरलेला ‘नथुराम गोडसे’ पुन्हा रंगभूमीवर येत आहे. एकाच वेळी येऊ घातलेल्या दोन नाटकांमुळे ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असे चित्र रंगभूमीवर दिसणार असून, त्यावरून वादाचे ‘प्रयोग’ रंगण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे माऊली प्रॉडक्शनचे नाटक लवकरच पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. त्याचबरोबर या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत दिसलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडेसे बोलतोय’ हे नाटक घेऊन येत असल्याचे जाहीर केले आहे. नाटकाचे शीर्षक जवळपास सारखे असल्याने त्यावरून न्यायालयीन लढाई सुरु झाली असून निर्माते उदय धुरत यांनी पोंक्षे यांना ७२ तासांचा कालावधी दिला असून जर त्यांनी माघार घेतली नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी सुरु केली आहे.

ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १० जुलै १९९८ साली माऊली प्रॉडक्शनतर्फे रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले होते. शरद पोंक्षे यांनी त्यात नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका लोकप्रियही ठरली होती. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक खूप चर्चेत राहिले. नाटकाचे ८१६ प्रयोग झाल्यानंतर २०१६ मध्ये निर्माते धुरत यांनी हे नाटक थांबविण्याचा निर्णय घेतला.

नाट्यनिर्माते धुरत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. विवेक आपटे याचे दिग्दर्शन करीत असून, त्याच्या तालमी ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले दिसणार आहे. हे नाटक ऑक्टोबरमध्ये येणार असल्याची जाहिरात जुलैमध्ये वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली होती. ‘नथुरामच्या भूमिकेतील कलाकाराचे नाव निश्चित झाल्यानंतर आता नाटकाच्या तालमी सुरू होत आहेत. नोव्हेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर येईल’, असे दिग्दर्शक विवेक आपटे यांनी सांगितले.

आमच्या माऊली प्रॉडक्शन्सची जाहिरात पाहून शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाची लेखक दिग्दर्शकाचे नाव नसलेली जाहिरात १५ ऑगस्टला प्रसिद्ध केली. पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत असून, नाटकाचे ५० प्रयोग होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘एवढ्या मोठ्या कलाकाराला एका ज्येष्ठ नाटककाराच्या संहितेची - शीर्षकाची गरज का भासली? नाटकाच्या संहिता - शीर्षकावरून न्यायालयीन लढाई होईल’, असे धुरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संदर्भात धुरत यांच्याकडून पोंक्षे यांना आतापर्यंत तीन नोटिसा पाठविण्यात आल्या असून शेवटच्या नोटीसची मुदत ७२ तासांची आहे. या पत्रकार परिषेदेत कायदेशीर माहिती जेष्ठ वकील ए. एल. गोरे यांनी दिली. 

नवा नथुराम कोण?

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत असताना ‘नथुराम’च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याविषयी उत्सुकता होती. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड झाली. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार याकडे नाट्यरसिकांसह नाट्यसृष्टीचे लक्ष असेल.

दरम्यान शरद पोंक्षे यांनी नथुराम गोडसे बोलतोय या आपल्या नाटकाची जाहिरात देऊन प्रयोग जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे पोंक्षे यांच्यासोबत निर्मिती करणारे प्रमोद धुरत हे उदय धुरत यांचे भाऊ असून या नाटकाच्या निमित्ताने भाऊ-भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचे दिसत आहे.

Share this article