या पिढीतील लहान मुले अतिशय तीक्ष्ण बुद्धीची असल्याचे दिसून येते. डिजिटल तंत्र त्यांनी मोठ्यांपेक्षा अधिक चांगले आत्मसात केले आहे. याच्या वरताण घटना अहमदाबाद येथील युरोकिडस् प्रिस्कूल मधील एका छोट्या विद्यार्थ्याच्या संदर्भात घडली आहे.
स्वयम् भुवा नावाचा चिमुरडा १०० कार्सचे लोगो फक्त २ मिनिटात ओळखतो. अन् धडाधडा त्यांची नावं सांगतो. त्याची स्मरणशक्ती व ग्रहणशक्ती अचाट आहे. शिशुवयातच त्याच्यात मोटारकार्सचे आकर्षण दिसून आले. अन् तो रस्त्यातून जाता-येता कार्सचे लोगो बघून त्यांची नावे पाठ करू लागला. बोलू लागला. त्याचे हे वेड इतके वाढले की, इंग्रजी पुस्तके, मासिके बघून, वेबसाईटवर जाऊन तो कार्सचे लोगो बघून त्यांची नावे मुखोद्गत करू लागला. अन् एके दिवशी त्याने १०० कार्सचे लोगो फक्त २ मिनिटे ५ सेकंदात ओळखून आपल्या पालकांना व शिक्षकांना चकित केले.
युरोकिडस् शाळेतील इंटरॲक्टिव फ्लॅशकार्डस्, या अभ्यासक्रमाचे मोठे पाठबळ त्याला लाभले असल्याचे स्वयम्चे आई-बाबा; भाविका व विशाल भुवा यांनी सांगितले. “त्याच्या चिकीत्सक बुद्धीला आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिले. अन् त्याचे हे टॅलेन्ट जोपासण्यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्या या गुणांची प्रेरणा जगभरातील लहान मुले घेतील, अशी आशा आहे”, असे त्यांनी पुढे सांगितले.
स्वयम् भुवाच्या या अचाट विक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्ने नोंद घेतली आहे.