Close

५ राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी बांगलादेशची अभिनेत्री जया अहसान हिचे ‘कडक’ सिंग या हिंदी चित्रपटात पदार्पण (5 Times National Award Winner Actress From Bangladesh Makes Her Debut In Hindi Film ‘Kadak Singh’)

बांगलादेशी चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री जया अहसान आता ‘कडक सिंग’ या हिंदी चित्रपटात दाखल झाली आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित या चित्रपटात तीपंकज त्रिपाठीची नायिका झाली आहे.

मॉडेलिंग विश्वातून बांगलादेशी चित्रपटात अवतरलेली जया अहसानचा चित्रपट सृष्टीतील प्रवास विस्मयकारक आहे. तिने आतापर्यंत ११० बांगलादेशी व बंगाली चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तसेच टी. व्ही. मालिका,  टेलिफिल्म आणि वेब शोज मधून अभिनयाची चमक दाखवली आहे. शिवाय काही चित्रपटांची निर्मिती केली आहे.

जया अहसानचा ‘कडक सिंग’ हा हिंदी चित्रपट गोवा इथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून प्रतिसाद दिला.

“हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस आहे. माझ्या आजवरच्या वाटचालीत मला ३२ पेक्षा अधिक पारितोषिके मिळाली आहेत. पण या आंतरराष्ट्रीय महोत्सवात मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मैलाचा दगड ठरावा. माझ्या नव्या प्रारंभाला हा आशीर्वाद लाभला हे बघून मी अतिशय आनंदी झाले आहे.” अशा शब्दात जयाने आपल्या भावना व्यक्त केल्या.   

जया अहसानकडे अभिनया व्यतिरिक्त इतरही चांगले गुण आहेत. ती प्रशिक्षित शास्त्रीय संगीत गायिका असून रवींद्र संगीताची डिप्लोमा धारक आहे. ‘कडक सिंग’ मधील पदार्पणाने विश्व चित्रपट उद्योगात अवतरल्याची तिची भावना आहे.

Share this article