डोळे आणि मन निमावतील असा निसर्ग आणि शरीर प्रसन्न करणारं हिमाचल प्रदेशातील वातावरण मनमुराद उपभोगण्यासारखं आहे. बर्फाच्छादित पर्वतरांगा पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल.
मे महिन्याचा कडक उन्हाळा अंग भाजून काढतो आहे. या वैशाख वणव्यात तनामनाला संपूर्ण गारवा मिळवायचा असेल तर सिमला-मनाली सारखं सर्वोत्तम ठिकाण नाही. प्रसन्न वातावरण, शुद्ध हवा आणि उत्तम गारवा देणार्या या हिमाचल प्रदेशातील रम्य स्थळांवर जायलाच हवं. डोळे आणि मन निमावतील असा निसर्ग आणि शरीर प्रसन्न करणारं वातावरण मनमुराद उपभोगण्यासारखं आहे. बर्फाच्छादित पर्वतरांगा पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल.
या निसर्गरम्य ठिकाणांची भेट म्हणजे सिमला-कुलू-मनाली अशी त्रिसूत्री आहे. पर्यटन संस्थेबरोबर गेल्यास ते चंदीगडची जोडही देतात. या मुलुखाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथे कोणत्याही जागेवरून बर्फाच्छादित पर्वत दिसतात. बियास आणि सतलज या खळाळणार्या नद्या आपली सोबत करतात. पाइन वृक्षांची जंगलं डोंगरांना हिरवाई देतात.
राजधानी सिमला इथे शॉपिंगची मौज असते. चांगल्या बॅगा, लोकरीचे कपडे, टोप्या, जॅकेट्ा आणि पंजाबी सूट्स यांची खरेदी करण्यास लोक उत्सुक असतात. सुकामेवा आणि फळांचाही हंगाम असल्यास, ते खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. शॉपिंगसाठी इथला मॉल रोड प्रसिद्ध आहे. तिथे जाण्यासाठी एक लिफ्ट आहे. पूर्वी या लिफ्टचं पर्यटकांना खूप आकर्षण असे. आता लहानमोठ्या शहरांमधील उंच इमारतींमधून लिफ्टचा प्रवास करण्याची लोकांना सवय झाली असल्या कारणाने या लिफ्टचं तेवढं कौतुक वाटत नाही. इथला जुना चर्च पाहण्यासारखा आहे. मुळातच हे थंड हवेचं ठिकाण ब्रिटिश राजवटीत महत्त्वाचं होतं. ब्रिटिश लोक इथे उन्हाळ्यामध्ये मुक्कामाला येत. पुढे आपले पंतप्रधान पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचंही हे आवडतं ठिकाण होतं. राजकीय इतिहासात सिमला करार प्रसिद्ध आहे.
निसर्गाचा चमत्कार
सिमल्यापेक्षा निसर्गरम्य आणि गारेगार ठिकाण म्हणजे मनाली. मनालीस मुक्काम करून वशिष्ट कुंड, हिडिंबा मंदिर, सोलांग व्हॅली आणि रोहतांग पास पाहता येतात. वशिष्ट कुंड आणि हिडिंबा मंदिर हे पांडवांशी निगडीत आहे. वशिष्ट कुंड म्हणजे गरम पाण्याचे झरे (गंधकयुक्त). कुंड लहान लहान आहेत. त्यात धार्मिक व औषधोपचाराच्या दृष्टीने लोक डुबक्या मारतात. परंतु, पाणी इतकं गढूळ व गचाळ आहे की, त्या डुबक्या पाहवत नाहीत. मात्र बर्फाने वेढलेल्या परिसरात बाराही महिने गरम पाण्याची कुंड कशी काय भरलेली राहतात, हा निसर्गाचा चमत्कार अचंबित करतो. हिंडिंबा मंदिराचा परिसर खूप छान आहे. उंच उंच देवदार वृक्षांची दाट झाडी आणि मधे मधे खडकांचे उंचवटे. हे उंचवटे म्हणजे फोटोग्राफी आणि सेल्फीसाठी उत्तम स्पॉट आहेत. सिमला-कुलू खोर्यात एकूणच जागोजाग पांडवांचं अस्तित्व स्थानिक लोक जाणवू देतात. या परिसरात बरेच दिवस वास्तव्य करून पांडव हिमालयात निघून गेले, अशी दंतकथा इथे प्रचलित आहे. इथून जवळच मनू मंदिर आहे, त्याच्याही बर्याच दंतकथा प्रचलित आहेत. इथल्या क्लब हाउस परिसरात स्थानिक वेशभूषा पुरवणारे फोटोग्राफर्स उभे असतात. त्या कपड्यांमध्ये फोटो काढून घेण्याची हौस पर्यटक भागवतात. त्यामध्ये पुढे रंगीत तुकडे लावलेली, दुमडलेली गोल टोपी पर्यटकांचं आकर्षण ठरते. कारण ती प्रत्येक हिंदी सिनेमात (जिथे नायक पहाडी मुलुखात जातो) नायकाने घालताना बघितलेली असते. राजेश खन्नाने ‘कुदरत’मध्ये घातलेली टोपी आठवा. अशाच टोप्या, गळ्यात चकचकीत माळा, कर्णफुलं आणि विविधरंगी ड्रेस घालून, रात्रीच्या वेळी हॉटेलांमधून स्थानिक कलावंत लोकनृत्य पेश करतात. शेकोटीभोवती नाचत हे नृत्य-गीत सादर केलं जातं. पर्यटक त्याचा आनंद घेतात. त्यांच्यात सहभागी होऊन नाचतात.
अवर्णनीय आनंद
मनालीहून 50 ते 60 किलोमीटर अंतरावरील रोहतांग रोडवरील बर्फक्रीडा हे येथील मुख्य आकर्षण होय. वळणावळणाच्या बर्फाळ पर्वतांमधून काढलेल्या रस्त्यांवरून मोटारगाडी आपल्याला या रोहतांगकडे नेते, तो अनुभव अतिशय रोमांचक असतो. एरव्ही सिनेमातून किंवा आता टी.एल.सी. चॅनलमधून पाहिलेले हे बर्फाच्छादित घाट पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. आपण मोटारीने जसजसं वर चढत जातो, तसतशी थंडी गारठवते. म्हणूनच घाट सुरू होण्यापूर्वी पर्यटकांना चामड्याचे कपडे घालण्याचे सल्ले दिले जातात. अल्प मोबदल्यात हे चामड्याचे कपडे भाड्याने मिळतात. ते आपल्या उबदार म्हणजे लोकरीचे स्वेटर्स किंवा जॅकेट-कोट यांच्यावरच घालायचे असतात. कानबंद फरची टोपी घालायची असते. अन् आपल्या बुटांसकट लाँग बुटांमध्ये पाय घालायचे असतात. गॉगल तर डोळ्यांवर हवाच. कारण पांढर्याशुभ्र बर्फावर सूर्यकिरणं इतकी परावर्तित होतात की, ती प्रखरता साध्या डोळ्यांना सोसवत नाही. असा सर्व थंडी विरोधक बंदोबस्त करूनच रोहतांग पासकडे जाणार्या एका छान घाटमाथ्यावर आपल्याला नेलं जातं. तिथे बर्फावर चालण्याचा, खेळण्याचा, घसरण्याचा, फोटो काढण्याचा आनंद अवर्णनीय आहे. मात्र आपण समुद्रसपाटीपासून खूपच उंचावर असल्याने व सभोवती बर्फाची थंडी असल्याने श्वासोच्छवासाला त्रास होऊ शकतो. म्हणूनच आधीपासून त्यावरची औषधं जवळ बाळगलेली बरी. श्वास मोकळा करण्याचं अगदी सोपं व जवळ बाळगण्याजोगं ‘औषध’ म्हणजे कापूर. कापूर डबीत घालून न्यायचा व तो इथे हुंगायचा. म्हणजे श्वसनाचा त्रास होत नाही. प्रत्यक्ष रोहतांग पास (खिंड) इथून दूरवर आहे. पण तिथे सुरक्षेच्या कारणास्तव नेलं जात नाही. शिवाय तिथे वर्षाचे आठ-नऊ महिने बर्फ पडत असतो. (त्यापुढे कारगील आहे.) या ठिकाणी बर्फामध्ये पाय रोवत चालण्याची, तिथे फिरण्याची मौज वर्णनापलीकडची आहे. इथे गेल्यावर नकळतपणे कित्येक हिंदी-इंग्रजी सिनेमात पाहिलेली बर्फावरची दृश्यं आठवतात. विशेष म्हणजे, या उंच, बर्फाळ घाटमाथ्यावर स्थानिक मंडळी खाली शेगडी लावलेल्या स्टीलच्या किटल्या घेऊन कॉफी विकत असतात. ती कॉफी एकाच घोटात संपवावी लागते, हे सांगायला नकोच.
साहसाला वाव
मनालीपासून थोड्याच अंतरावर साहसी पर्यटकांसाठी वॉटर राफ्टिंग केलं जातं. बियास नदीच्या पांढर्या स्वच्छ, खळाळत्या पाण्यावर हे राफ्टिंग केलं जातं. रिव्हर क्रॉसिंगही भन्नाट असतं. तसंच इथे काही पर्यटन ठिकाणांवर बैलासारखा दिसणारा याक हा केसाळ प्राणी घेऊन काही पहाडी लोक उभे असतात. या प्राण्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी ते पर्यटकांना खुणावतात. मात्र असा फोटो काढून देण्यासाठी ते पैसे घेतात. शंभराहून अधिक रुपये मागतात. तीच गोष्ट सशाची. बर्फाळ प्रदेशातील केसाळ व आकाराने मोठा, गलेलठ्ठ ससा घेऊन हे पहाडी लोक उभे असतात. त्याला हातात घेऊन फोटो काढण्याचा मोह आपल्याला होतो. पण त्यासाठीही हे लोक पैसे मागतात.
पैसे देऊन काही क्रीडा इथे सोलांग व्हॅलीत करता येतात. चहूबाजूला बर्फाच्छादित डोंगर आणि मधोमध ही गवताळ सोलांग व्हॅली, हे दृश्य नेत्रसुखद आहे. इथे मोठा उतार आहे. ही जागा आपण पूर्वी अनेक हिंदी सिनेमात पाहिली असल्याचं, इथे गेल्यावर लक्षात येतं. फुग्यात बसून उतारावरून गडगडत आणलं जातं. शिवाय पॅरा ग्लायडिंग इथे करायला मिळतं. या सर्व खेळांची मौज न्यारी वाटते. मनालीमध्ये शॉपिंगचीही मौज अनुभवता येते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे सिमला-कुलू-मनाली हा परिसर मधुचंद्रास जाणार्या जोडप्यांना जवळचा वाटतो. इतरांना मात्र कडक उन्हाळ्यात गारेगार करणारा परिसर म्हणून अधिक जवळचा वाटतो.
विहंगम दृश्य
या संपूर्ण परिसरातील घरं, इमारती, कार्यालयं डोंगरांच्या उतरंडीवर बांधलेली आहेत. एका हॉटेलचं प्रवेशद्वार नागमोडी रस्त्याला लागून, तर मागच्या बाजूस खोल दरी आहे. हॉटेलात प्रवेश करतो
तो तळमजला, तर बाकीचे मजले जमिनीच्या खाली, वर नव्हे! म्हणजे मजल्यावरच्या रूममध्ये जायचं म्हणून लिफ्टमध्ये जाऊन तिसर्या मजल्याचं बटण दाबलं, तर लिफ्ट खाली जाते, वर नव्हे! रूमच्या खिडक्यांमधून, पॅसेजमधून खोल दरीचं विहंगम दृश्य व दुसर्या डोंगरावरील असंच उतरंडीवरील घरांचं अजब दृश्य पाहायला मिळत होतं. इथल्या कोणत्याही घरात, हॉटेलात पंखे नाहीत. त्यांची गरजच नाही.
कारण आपल्या कडक उन्हाळ्यातही इथलं वातावरण गारेगार असतं. रात्री झोपताना दोन ब्लँकेट्स घेऊनही कुडकुडायला होतं.
इथे बर्फाचा मौसम म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. डिसंेंबर-जानेवारी महिन्यात तर इथे तीन-चार फूट जाडीचा बर्फ साठलेला असतो. दररोज सकाळी बुलडोझरने बर्फ फोडून रस्ते मोकळे केले जातात. या दिवसांमध्ये इथले जनजीवन ठप्प असतं. शाळांना सुट्ट्या असतात. तरी लोक बर्फातले अन् बर्फाशिवायचंही जीवन आनंदाने जगतात.