आमिर खान प्रोडक्शनचा चित्रपट ‘लापता लेडीज’ १ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात प्रतिक्षा रांटा,नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. किरण राव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशन याने या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने सांगितले की, सुरुवातीला आमिरला चित्रपटात ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करायची होती. यासाठी त्याने ऑडिशनही दिले होते, पण नंतर किरणला वाटले की रवी या भूमिकेत चांगला दिसतो आणि तिने रवीला कास्ट केले.
'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा किरणला आमिर या चित्रपटात स्पेशल अपिअरन्स करणार का असे विचारण्यात आले तेव्हा किरण म्हणाल्या, 'आमिर आणि मी या व्यक्तिरेखेची बराच वेळ चर्चा केली होती. आमिरने मनोहरची भूमिका साकारावी अशी माझी इच्छा होती. आमिरनेही या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते जे अप्रतिम होते, पण जेव्हा मी त्याला त्याच भूमिकेसाठी रवी किशनची ऑडिशन टेप दाखवली तेव्हा आमिरने स्वतः सांगितले की ही भूमिका किशनला जास्त शोभते.’
आणि खरोखरच रवी किशन यांनी या भूमिकेचं चीज केलं. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही तरी आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
(All Phtotos- Social Media)