बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असणारी आश्रम ही एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज विशेष गाजली होती. या वेबसीरिजचे तीन सिझन सुपरहिट ठरल्यानंतर आता वेब सीरिजचा पुढचा सिझन येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
बाबा निरालाच्या भूमिकेत असणाऱ्या बॉबी देओलला या मालिकेनं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याचे दिसून आले. बॉबी देओल आज ज्या प्रसिद्धीच्या झोतात दिसून येतो त्यात त्याच्या आश्रम नावाच्या मालिकेचे मोठे योगदान आहे, असे म्हटले जाते. प्रकाश झा यांना त्या मालिकेच्या दिग्दर्शनाच्या वेळी अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. बॉबी देओलसह त्या मालिकेत त्रिधा चौधरी, आदिती पोहनकर, दर्शन कुमार, ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
यापूर्वी या मालिकेच्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून चौथ्या सीझनची वाट पाहत होते. अखेर तो सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आश्रमचा तिसरा सीझन हा २०२२ मध्ये आला होता. आता चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. खरं तर आश्रम ४ ही गेल्या वर्षी एमएक्स ओटीटीवर प्रदर्शित होणार होती. मात्र काही कारणास्तव ती झाली नाही. आता त्या मालिकेच्या चौथ्या सीझनची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राजकारण, ड्रग्स प्रकरण या सगळ्या विषयांमध्ये गुंतलेली ही वेबसीरिज उत्सुकता वाढवणारी आहे.आता चाहत्यांमध्ये चौथ्या सिझनची उत्सुकता पाहायला मिळते.