ॲमॅझॉन प्रस्तुत ‘पोचर’ ही थरारक मालिका प्राईम व्हिडिओवर लवकरच दाखल होत आहे. या क्राईम थ्रिलरची कार्यकारी निर्माती आलिया भट्ट असून, या मालिकेच्या ट्रेलर अनावरण प्रसंगी तिने आपले मनोगत व्यक्त केले. “हत्तींची अवैधरित्या शिकार करून त्यांच्या हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही मालिका आहे. लेखक-दिग्दर्शक रिची मेहताने हा विषय मला ऐकवला तेव्हा मी चकित झाले. जंगलातील शिकारचोर व त्यांचा मुकाबला करणारे वन्य अधिकारी यांच्यातील संघर्षाच्या या कथेने माझे डोळे पाणावले, मी मनातून हादरले. वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता किती आहे, याबद्दल ही मालिका प्रेरणादायी ठरेल. या मालिकेच्या निर्मितीत पुढकार घेतला, याचा मला अभिमान आहे. यामध्ये काम करणाऱ्या सर्वच कलाकारांची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे,” असे आलिया भट्ट म्हणाली.
या मालिकेची आलिया भट्ट कार्यकारी निर्माती असून ऑस्कर पारितोषिक विजेती क्यूसी एंटरटेनमेंट या कंपनीने तिची निर्मिती केली आहे. तर ॲमी पुरस्कार विजेता निर्माता रिची मेहता यांनी तिचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. ८ भागांची ही मालिका हिंदी, इंग्रजी व मल्याळम् भाषेत, २३ फेब्रुवारीपासून प्राईम व्हिडिओवर जगभर प्रदर्शित केली जाईल. निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू व दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
केरळ राज्यातील घनदाट जंगलात होणाऱ्या अवैध हत्ती शिकारींवर आधारित ही मालिका सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगून प्राईम व्हिडिओचे कन्टेन्ट डायरेक्टर लायसन्सिंग मनीष मेघनानी म्हणाले की, “दिग्दर्शक रिची मेहता यांच्याकडे याबाबत हजारो पानांचे संदर्भ आहेत. मालिका पकड घेणारी आहे नि मनोरंजनाबरोबरच विचार करायला लावणारी आहे.”
“वन्यप्राण्यांची अवैध शिकार करणाऱ्या गुन्हेगारांशी संघर्ष करणारे वन अधिकारी, वन्यजीव संरक्षण व सुरक्षा संघटनांचे उत्साही सदस्य व पशुप्रेमी लोकांना ही मालिका समर्पित आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी व अवैध मार्गाने पैसा मिळविण्यासाठी जंगली प्राण्यांचा जीव घेणाऱ्या लोकांविरुद्ध ही मंडळी आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत. त्यांचा संघर्ष या मालिकेत दिसेल,” असे प्रतिपादन लेखक-दिग्दर्शक रिची मेहता यांनी केले.
“पोचर मालिकेच्या प्रत्येक भागाच्या शेवटी एक क्युआर कोड दाखविण्यात येणार आहे. तो स्कॅन करून प्रेक्षकांनी आपले आर्थिक योगदान करावे, ही अपेक्षा आहे. कारण याद्वारे जमा होणारी रक्कम वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाला दान केली जाईल,” असे प्राईम व्हिडिओचे कंट्री डायरेक्टर सुशांत श्रीराम यांनी या प्रसंगी सांगितले.