अभिनेत्री अदिती सारंगधर ही अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. कधी खलनायिकेच्या तर सोज्वळ तिच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. दरम्यान अदिती जितकं तिच्या कामाविषयी बोलत असते तितकचं ती तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. अभिनेत्री अदिती सारंगधर हिने नुकतीच तिच्या गरोदरणातील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
अदितीने अलिकडेच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने तिला गरोदरपणात बियर पिण्याचे डोहाळे लागले होते, असा खुलासा केला. तसेच तिला डॉक्टरांनी देखील बियर पिण्याचा सल्ला दिला होता, असंही अदितीने म्हटलं. सध्या सोशल मीडियावर अदितीच्या हा किस्सा बराच गाजतोय. त्यातच तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अदितीने तिच्या बाळंतपणावेळीच्या दिवसांवर भाष्य केलं होतं. त्यावेळी माझ्यासोबत कुणीच नव्हतं असंही तिनं म्हटलं होतं.
हा किस्सा सांगताना अदितीने म्हटलं की, माझ्या गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी खूप उत्साहित होते. तेव्हा मला बियर प्यायचे डोहाळे लागले होते. मग मी गरोदरपणात बियर प्यायला लागले. मी तेव्हा इंडियन फूड खाल्लंच नाही. मी सॅलड खायचे आणि बियर प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं की, मी काय करु बियर नाही प्यायले तर मला कसं तरी होतं. मला राग यायला लागतो. मग त्या म्हणाल्या की, घ्या दोन - दोन सीप घेत जा. मग मी नऊ महिने बियर प्यायचे. भात आणि फोडणी वैगरे आली ना त्यातली एक एक मोहरी अशी काढून बाजूला करायचे. घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे मी इंडियन फूडच बंद केलं. मग मी नऊ महिने सॅलड आणि बियरच खाल्लं प्यायलं होतं.
याआधी दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलासाठी मी अभिनयातून ब्रेक घेतल्याचं तिने सांगितलं. त्यावर अदितीने म्हटलं होतं की, माझं बाळ झाल्यानंतर त्याला वेळ देता यावा यासाठी मी कामातून काही वर्ष ब्रेक घेतला होता. कारण तो मोठा होत असतानाचे क्षण मला आयुष्यातून निसटून द्यायचे नव्हते. तेव्हा त्याला जास्तीत जास्त वेळ देणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. पण आता तो मोठा होतोय, त्यामुळे मीसुद्धा पुन्हा कामाला सुरुवात केलीये. पण या ब्रेकनंतरही मिळाणारी सुंदर कामं आणि प्रेक्षकांचं प्रेम ही भावना खरंच खूप सुंदर आहे.
अदितीचा बाई गं हा चित्रपट लवकरच येणार आहे. यात अदितीसोबतच स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहेरे देखील असणार आहेत.