Close

मुंबई महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी राबवलेल्या स्तन कर्करोग उपक्रमात अभिनेत्री महिमा चौधरीचे मार्गदर्शन (Actress Mahima Chaudhary Shares Her Experience with Women Police Officers In Breast Cancer Awareness Program)

“मी स्वतः स्तनांच्या कर्करोगाचा सामना केला असल्याने हा आजार लवकरात लवकर लक्षात येण्याचे महत्त्व आणि परिणाम मी चांगलेच जाणते. म्हणूनच ‘थँक्स अ डॉट’ हा उपक्रम माझ्यासाठी खूप जवळचा आहे,” अशी सुरुवात अभिनेत्री अभिनेत्री महिमा चौधरीने मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमात बोलताना केली. “स्वतः स्वतःची स्तन तपासणी करण्याची सवय लावून घ्या. स्तनामध्ये निर्माण होणाऱ्या गाठीची तपासणी करण्यासाठी स्वतः डॉक्टर बना. या येऊ घातलेल्या रोगास सुरुवातीला पकडा. अजिबात घाबरु नका. आपण दिवसभरात इतके सेल्फी घेतो. मग वर्षभरातून एकदा आपल्या शरीरातील आतल्या भागाचा सेल्फी घ्या,” असे मार्गदर्शन महिमाने पुढे केले.

महिला पोलिसांना सहन करावे लागणारे शारीरिक व मानसिक ताणतणाव लक्षात घेऊन, त्यांना संभाव्य कर्करोगाबाबत सावध करण्यासाठी एसबीआय लाइफने स्तन कर्करोग जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी महिमाने वरील उद्गार काढले. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सहकार्य लाभले होते. सदर कार्यक्रमात दोन एकशे महिला पोलीस अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव व सांताक्रुझ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती हिवारे उपस्थित होत्या.

“आईचा त्याग हा सर्वश्रेष्ठ त्याग आपण मानतो. परंतु कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस करत असलेला त्याग देखील मोठा आहे,” असे गौरवोद्गार लायन्स क्लबच्या क्युरेटर आणि मुंबई लायन्सच्या पहिल्या महिला गव्हर्नर भावना शहा यांनी काढले. “माझी आई व बहीण स्तनाच्या कर्करोगाने दगावल्या आहेत. तेव्हापासून मी या रोगाच्या जागरुकता कार्यक्रमात स्वतःला वाहून घेतले,” असे सांगून भावी काळात ५ हजार पोलिसांचे चेकअप करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.

“स्तन कर्करोगाच्या ६० टक्के केसेस शेवटच्या टप्प्यात उघडकीस येतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी ‘थँक्स अ डॉट’ हा उपक्रम सुरू करून हॉट वॉटर बॅगची निर्मिती आम्ही केली. त्यातून १० लाख महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो. सदर वॉटर बॅग हे अलार्म घड्याळ आहे. तिच्या आधारे जागे व्हा. स्वतःची स्वतः स्तन तपासणी करा,” असे एसबीआय लाइफचे चीफ ऑफ ब्रॅण्ड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन ॲन्ड सीएसआर, रविन्द्र शर्मा यांनी सांगितले. तसेच स्तनातील गाठ टिपण्यासाठी मदत करणाऱ्या या हॉट वॉटर बॅगचे पेटन्ट आम्ही खुले केले असून इतर लोक, संस्था आता तशाच बॅग्ज तयार करून अधिकाधिक महिलांची मदत करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांना या बॅग्जचे वाटप करण्यात आले. शिवाय महिलांच्या कॅन्सर बाबत उपचार करणाऱ्या कॅन्सर सर्जन डॉ. निहारिका गरच यांनी स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे, निदान, उपचार व जागरुकता याबाबत दृकश्राव्य प्रात्यक्षिकांसह मोलाचे मार्गदर्शन केले. 

Share this article