स्टार प्रवाहवर १७ जून पासून सुरु होतेय नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं. मालिकेच्या प्रोमोमधून शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणजेच गायत्री आणि तेजस लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे गायत्री प्रभू. गायत्रीचा माणसांपेक्षा पैशांवर जास्त विश्वास आहे. प्रभू कुटुंबाची भली मोठी वास्तू आणि प्रतिष्ठा पाहूनच तिने या घरची सून होण्याचा निर्णय घेतला. गायत्री हुशार आणि स्वावलंबी आहे. ती फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे. तिचा रेकॉर्ड आजवर कुणीच मोडलेला नाही. गायत्रीला समोरच्या व्यक्तीला हरताना पाहायला आवडतं. ती कधीच कोणाला स्वत:समोर जिंकू देत नाही, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.
अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. १० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली. ‘गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरु असते. त्यामुळेच गायत्रीला आव्हान देणारा तेजस आणि तिचा फिनिशिंग कॉलेजमधला रेकॉर्ड मोडू पाहणाऱ्या मानसीला ती अद्दल घडवू इच्छिते.
गायत्रीचा लूक मला फारच आवडला. मुळात मला साडी नेसायला खूप आवडतं. गायत्रीच्या लूकसाठी डिझाईन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात ही हटके व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.