अभिनेत्री श्रृती हासन ही अत्यंत स्पष्ट आणि परखड मते मांडणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच गायनामध्येही आपले नाव कमावणाऱ्या श्रृतीने स्वत:ला चाकोरीमध्ये न अडकवता मुक्तपणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला आहे. 'जग काय म्हणेल' याकडे लक्ष न देता आपल्या मनाला काय वाटतंय ते करणे श्रृतीने पसंत केले आहे. आपल्याप्रमाणे इतर महिलांना प्रेरीत करण्यासाठी श्रृतीने कोटोवर आपला एक समुदाय सुरू केला आहे. ‘मॉन्स्टर मशीन’ गाण्याची गायिका श्रृतीने 'अर्बन चुडैल' नावाची कम्युनिटी सुरू केली आहे.
कोणत्याही व्यक्तीने स्वत:शी प्रामाणिक राहिले पाहिजे असे श्रृतीला वाटते, तिने स्वत:ने हाच मार्ग स्वीकारला आहे. अनेकांना अर्बन चुडैल हे कम्युनिटीचे नाव वाचून आश्चर्य वाटले असेल मात्र यामागची संकल्पना उलगडून सांगताना श्रृतीने म्हटले की, "आपण या नावाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. हे नाव निवडून अस्सलपणा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, खास करून महिलांमधील अस्सलपणा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरी भागातील व्यस्त आयुष्यात महिलांची वेगवेगळी व्यक्तिमत्वे पाहायला मिळतात. हे प्रत्येक व्यक्तिमत्व अत्यंत अनोखं असतं आणि हीच बाब त्यांना 'चुडैल' बनवतात. काही जणी त्यांच्या कामुकतेबाबत खुलेपणाने बोलतात, काही जणी एकटं आणि स्वतंत्र राहणं पसंत करतात. कोटो एक असा मंच आहे जिथे महिलांना विशिष्ट रुपाने 'चुडैल' बनविणाऱ्या गुणांचे कौतुक होणे गरजेचे आहे तसेच या गुणांबद्दल जल्लोषही साजरा करणे गरजेचे आहे."
श्रृती, हिलिंग क्रिस्टल्स, अभिव्यक्ती आणि 'उच्च शक्ती' वर विश्वास ठेवणारी आहे. हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे तिचे म्हणणे आहे. कोटोवरील तिच्या समुदायात विविध व्यक्तिमत्त्वांच्या महिलांना सामील होण्याचे खुले आमंत्रण आहे. विविध पार्श्वभूमीच्या महिलांना त्यांच्या स्वत:च्या दृष्टीकोनांसह या मंचावर स्थान देण्यात येईल. कोटो कम्युनिटीवर त्या लैंगिक, मानसिक आरोग्य, करिअर, जीवन, संगीत कला यासह असंख्य विषयांबाबत स्वत:ची मते खुलेपणाने मांडू शकतील.