मराठी चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय जोड्यांनी त्यांच्यातील केमिस्ट्रीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या काही लोकप्रिय जोड्यांपैकी अजिंक्य देव आणि अश्विनी भावे ही जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे. तब्बल २५ वर्षांनी 'घरत गणपती' या चित्रपटातून हे दोघेही एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.
मराठीमधील 'सरकारनामा' या चित्रपटानंतर हे दोघेही ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. या चित्रपटात अजिंक्य हा शरद घरत आणि अश्विनी अहिल्या घरतची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव एक कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी असणारी करारी आई अश्विनी भावे साकारणार आहे.
‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे अजिंक्य आणि अश्विनी यांच्यातली केमिस्ट्री आपण पडद्यावर पाहिलीच आहे. आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकत्र झळकणार पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. रुपेरी पडद्यावरील आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला आहे. ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरत गणपती’ हा चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.