Close

स्टार कीड अलाया फर्निचरवालाच्या वर्कआऊटने नेटकऱ्यांचं लक्षं वेधलं… (Alaya Furniturewala intense workout in gym trainer boxing on her stomach)

बॉलिवूडमधील बरेच कलाकार त्यांच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक असतात. अगदी स्टारकिड्ससुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. सारा अली खान आणि जान्हवी कपूरसारखी हल्लीची पिढी देखील एकत्र वर्कआऊट करत चाहत्यांना व्यायाम आणि फिटनेससाठी प्रोत्साहन देतात. काही वेळेस यांच्या वर्कआऊटच्या तऱ्हा इतक्या अजब असतात की त्या चाहत्यांचं लक्ष वेधणाऱ्या असतात. आता असाच एका स्टारकिडच्या वर्कआऊटचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चर्चिला जात आहे. ही स्टारकिड आहे अलाया फर्नीचरवाला.

अलाया ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर ती तिच्या चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने काही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये ती व्यायाम, डान्स, योगा असं सर्वकाही करताना दिसतेय. मात्र त्यातील पहिल्या व्हिडिओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

या व्हिडिओमध्ये अलाया जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतेय. मात्र हा वर्कआऊट नेहमीपेक्षा खूपच वेगळा आहे. कारण जिम ट्रेनर त्याच्या हातात बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घालून अलायाच्या पोटात पंच करताना दिसतोय. अलाया काही सेकंद हे पंचेस झेलते आणि त्यानंतर त्याला थांबण्यास सांगते.

अलायाचा हा वर्कआऊट पाहून नेटकऱ्यांना बरेच प्रश्न पडले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘तो तुला का मारत आहे? हा कोणता व्यायामाचा प्रकार आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे सुरक्षित नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. तर ॲब्स पंचिंगमुळे स्नायू मजबूत होतात, असंही काहींनी म्हटलं आहे.

अलायाने २०२० मध्ये ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एका मुलाखतीत अलाया म्हणाली, “लोकांनी कायम माझा नेपोकिड (घराणेशाहीतून आलेली मुलगी) म्हणून उल्लेख केला आहे. सेलिब्रिटी कीड असल्यामुळे मला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली आहे. पण मिळालेल्या संधीसोबत अनेक जबाबदाऱ्यांचा देखील सामना करावा लागतो. घराणेशाहीमुळे बॉलिवूडमध्ये संधी मिळू शकते. पण यश तुमच्या मेहनतीवर आणि नशीबावर अवलंबून असतं. मी लोकांची विचारसरणी बदलू शकत नाही पण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी तशीच राहील. मी माझ्या कामात काही बदल नक्कीच घडवून आणू शकते.”

Share this article