बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. याबाबत यामीने आज ( २० मे ) इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसंच बाळाचं नाव काय ठेवलं याचा खुलासा देखील तिने या पोस्टद्वारे केला आहे.
यामी गौतम काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला तिचा दिग्दर्शक पती आदित्य धर याने अभिनेत्री लवकरच गुडन्यूज देणार असल्याचं जाहीर केलं होतं. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं. परंतु, बरोबर दहा दिवसांनी म्हणजेच आज (२० मे) यामीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.
यामी तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “१० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आम्हाला मुलगा झाला. आम्ही आमच्या बाळाचं नाव ‘वेदविद’ असं ठेवलं आहे. वेदविद म्हणजे चांगले वेद, संस्कार जाणणारा…आम्ही दोघं आता पालकत्वाच्या सुंदर अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत. आमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. माझा मुलगा आपल्या देशासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल अशी आशा मी व्यक्त करते.”
यामी गौतम व आदित्य धरचा विवाहसोहळा ४ जून २०२१ रोजी पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील यामीच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला होता. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी यामी व आदित्यने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर दोघेही काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता लग्नाच्या तीन वर्षांनी यामी आणि आदित्य आई-बाबा झाले आहेत. या दोघांनी बाळाचं ‘वेदविद’ हे नाव ठेवलं असून सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.