'टाइम' मासिकाने बुधवारी २०२४ या वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाचाही समावेश आहे. एक 'अद्भुत टॅलेंट' असे तिचे वर्णन करण्यात आले आहे. याशिवाय भारतीय-ब्रिटिश अभिनेता देव पटेल आणि प्रसिद्ध गायिका दुआ लिपा यांचीही नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. १०० जणांच्या या यादीत एकूण १५ कलाकारांना स्थान मिळाले आहे.
कलाकारांव्यतिरिक्त, आयकॉन, टायटन्स, नेते, नवोदित आणि पायनियर या क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना 'टाइम' मासिकाच्या २०२४ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. आलिया भट्ट, देव पटेल आणि दुआ लिपा यांच्याशिवाय कुस्तीपटू साक्षी मलिक, उद्योगपती अजय बंगा, जिगर शाह, अस्मा खान, प्रियमवदा नटराजन यांसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या नावांचा समावेश आहे.
लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते टॉम हार्पर यांनी आलिया भट्टचे वर्णन 'अद्भुत टॅलेंट'पैकी एक आहे. ती जगातील टॉप अभिनेत्रींपैकी एक असल्याचे तिच्या प्रोफाइलमध्ये लिहिले आहे. गेले एक दशक ती हिंदी चित्रपटसृष्टीत कौतुकास्पद काम करत आहे. यासोबतच तिच्या चांगल्या स्वभावाचे आणि प्रामाणिकपणाचेही कौतुक करण्यात आले आहे. आलियाने तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये 'टॉम हार्पर'सोबत काम केले आहे.
देव पटेल 'मंकी मॅन'मध्ये दिसणार
या यादीत आठ ऑस्कर विजेते चित्रपट 'स्लमडॉग मिलेनियर'चा अभिनेता देव पटेल याच्या नावाचाही समावेश आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'मंकी मॅन' चित्रपटाचेही कौतुक होत आहे.
दुआ लिपाच्या नावाचाही समावेश
या कलाकारांच्या यादीत प्रसिद्ध गायिका दुआ लिपा हिचेही नाव आहे. तिने आतापर्यंत तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. गायिका असण्यासोबतच ती गीतकारही आहे.