दीपिका पादुकोणने फेब्रुवारी महिन्यात गरोदर असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून सतत तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. दीपिकाचे चाहते ती आई होणार म्हणून अतिशय खुष आहेत तर दुसरीकडे अशीही लोकं आहेत की जी तिला वारंवार टार्गेट करत आहेत.
आता सोमवारचीच गोष्ट, लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. मात्र त्यानंतरही काहींनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्री आलिया भट्टने या नकारात्मक टिप्पण्यांविरोधात दीपिकाची साथ दिली आहे.
काही दिवसांपूर्वी दिपिकाचं पोट दिसत नाही म्हणून नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नंसीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता पोट दिसल्यावरही ‘फेक बेबी बंप’चा आरोप करत नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगदरम्यान ज्येष्ठ पत्रकार फाये डिसूझा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.
‘प्रिय सोशल मीडिया, दीपिका पादुकोण तिचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडली होत. तिने तिच्या शरीरावर किंवा प्रेग्नंसीवर तुमचा फीडबॅक मागितला नव्हता. तुम्हाला तिच्या आयुष्यातील कोणत्याच पैलूवर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. हे थांबवा आणि सुधारा’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. फाये डिसूझा यांच्या पोस्टला आलिया भट्टने लगेचच लाइक केलंय. फक्त आलियाच नव्हे तर तिची बहीण पूजा भट्ट, शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांनीसुद्धा या पोस्टला लाइक केले आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली होती
दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय ती लवकरच ‘कल्की 2989 एडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती प्रभाससोबत भूमिका साकारणार आहे. चित्रपटात दीपिका आणि प्रभाससोबत अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.