'अलीबाबा आणि चाळीस चोर' ही गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून तुम्हाला नवल वाटले असे ना? तर ही काही गोष्ट नसून हा नवीन चित्रपट आहे जो लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.
मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवाणी असणार आहे. त्यांच्या भेटीला एक नव्या धाटणीचा चित्रपट येत आहे. 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) हे कलाकार तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाचे नाव खूपच जबरदस्त आणि उत्सुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे गुन्हा आहे का? आणि हे नेमके काय प्रकरण आहे? तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांची उत्तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच म्हणजे २९ मार्चला मिळतील. नुकताच रिलीज झालेल्या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटातील कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितले की, 'विवाहीत असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे. आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्याने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.'