Close

रंगभूमी गाजवायला पुन्हा येतय ऑल द बेस्ट नाटक, १५ वर्षांनी पुनरागमन (All The Best Marathi Play Directed By Devendra Pem Back To Theaters After 15 Years)

मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’. देवेंद्र पेम लिखित ही एकांकिका ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली. ३१ डिसेंबर १९९ ३ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभुमीवर मोठा इतिहासचं घडवला.

या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिलेच पण भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर हे सूपरस्टार सुध्हा दिले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकातून करिअरची सुरुवात केली.


मुका, बहिरा व आंधळा अशा मित्रांची कथा असलेलं हे धमाल नाटक रसिकांनी न भूतो अस उचलून धरलं. नाटकाच्या प्रयोगांचा ओघ एव्हढा प्रचंड होता की एकाच वेळी तीन टिम्स 'ऑल द बेस्ट'चे प्रयोग करत होते. दर महिन्याला साठ ते सत्तर प्रयोग व्हायचे. नाटकाच्या पहिल्या पाच वर्षात तब्बल २१०० प्रयोग झाले.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांनी या नाटकाची तारीफ करत देवेंद्र पेम यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झालं असुन त्याचे जवळ जवळ १०००० प्रयोग झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. ती लक्षात घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. नव्या दमाच्या मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री या कलाकारांनी नाटकाची जोरदार तालीम सुरु केली आहे.

नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम म्हणाले की, "या नाटकावर मराठी रसिकांनी अपार प्रेम केलं. त्यांना हे नाटक पुन्हा पाहायला निश्चित आवडेल. गेल्या १५-२० वर्षात आलेल्या नव्या पिढीला 'ऑल द बेस्ट' नाटकाचं नाव माहीत आहे. त्यांनाही हे विश्वविक्रमी नाटक पाहता यावं आणि या नाटकाचा आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही हे नाटक नवपिढीसाठी घेऊन येत आहोत".

'अनामय' नाट्यसंस्थेची निर्मिती असणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग २ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. नव्या नाटकातील तरुण कलाकारही या गाजलेल्या नाटकासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत. या नव्या संचातून जुन्या रसिक प्रेक्षकांसह नव्या प्रेक्षकवर्गालाही आनंद मिळेल यांत शंका नाही.

Share this article