Close

अंबानी कुटुंबियांनी थाटून दिला ५० गरीब जोडप्यांचा संसार, सध्या सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चर्चा… (Ambani Family Hold Mass Wedding Of Underprivileged Couples And Gave Them Costly Gifts)

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आहे. काल २ जुलै २०२४ रोजी अंबानी कुटुंबाने ‘रिलायन्स कॉर्पोरेट पार्क’ येथे ५० वंचित जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. ज्यामध्ये जवळपास ८०० पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यात नीता अंबानी आणि मुकेश अंबानी देखील त्यांच्या कुटुंबासोबत उपस्थित होते. सध्या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सामूहिक विवाह सोहळ्याच्या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये नीता अंबानी पती मुकेश यांच्यासोबत बसून मंत्रोच्चार करतानाही दिसत आहेत. सांगायचं म्हणजे, १२ जुलै २०२४ मध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. त्याआधी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी ५० गरीब जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. पालघरला हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.

रिपोर्टनुसार सामुहिक विवाह सोहळ्यात नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या जोडप्यांना अंबानी कुटुंबाकडून काही भेटवस्तूही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये मंगळसूत्र, अंगठी आणि नथ यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना जोडवी, पैंजण यांसारखे चांदीचे दागिनेही भेट म्हणून दिल्याची माहिती मिळत आहे. प्रत्येक वधूला स्त्रीधन म्हणून एक लाख रुपयांचा धनादेशही दिल्याची माहिती समोर येत आहे.

एवढंच नाही तर, विवाहित जोडप्यांना वर्षभरासाठी पुरेसा किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट दिल्या जातील, ज्यामध्ये विविध प्रकारच्या ३६ जीवनावश्यक वस्तू आणि भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर, पंखे तसेच गाद्या आणि उशा यांचा समावेश आहे. अशा या सामुहिक विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Share this article