मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. गेल्या कित्येक महिन्यांपासून विवाहसोहळ्यासंबंधीत सुरू असलेल्या सर्व समारंभांचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे. या लग्नासाठी अनेक नामवंत व्यक्ती तसेच बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली. त्यानंतर सोशल मीडियावरून अनंत-राधिकासोबतच फोटो पोस्ट करत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. या सर्व सेलिब्रिटींसोबतच अनंतच्या माजी नॅनी ललिता डिसिल्वा यांनीही त्यांच्या लग्नाला हजेरी लावली आणि जोडप्याला आशीर्वाद दिला.
अलिकडेच ललिता यांनी सोशल मीडियावर अनंतसाठी एक भावनिक नोट शेअर केली. त्यांनी लिहिले, 'माझ्या आयुष्यात आनंद आणल्याबद्दल मी अनंत बाबा आणि अंबानी कुटुंबाची आभारी आहे. त्यांचा हा दयाळूपणा मला अनेक वर्षांपासून प्रेरणा देत आहे.’
याआधी १२ जुलैला अनंतच्या लग्नाच्या दिवशी ललिता यांनी त्यांचा लहानपणीचा फोटोही शेअर केला होता. यामध्ये त्या अनंतसोबत पॅरिसमधील डिस्ने वर्ल्डमध्ये फिरताना दिसल्या होत्या. या पोस्टमध्ये ललिता यांनी सांगितले होते की, त्यांनी अनंतसोबत बेबी केअरची नोकरी सुरू केली होती. अनंत लहानपणी खूप चांगला मुलगा होता. आजही त्याचे कुटुंब असो किंवा सामाजिक गट, सर्वजण त्याच्यावर खूप प्रेम करतात. यासोबतच ललिता यांनी अनंतला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
ललिता केवळ अनंतचीच नाही तर करीना कपूरची मुले तैमूर आणि जेह यांच्याही नॅनी राहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी साऊथचा सुपरस्टार रामचरणची मुलगी क्लाइनचीही काळजी घेतली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक सेलिब्रिटींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.