अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याची अजूनही चर्चा सुरू आहे. १२ते १४ जुलै दरम्यान पार पडलेल्या विवाहसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी मंडळींनी हजेरी लावली. दिग्गज गायकांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर केले. अनंतरची वरातही खूप गाजली. संपूर्ण बॉलिवूड अनंतच्या वरातीमध्ये सामील झालं होतं आणि यावेळी एका मराठमोळ्या गायकाने केलेला परफॉर्मन्सही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
गुलाबी साडी या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या गायक संजू राठोडला चक्क अंबानींच्या वरातीमध्ये परफॉर्मन्स सादर करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं केलं. संजूने गुलाबी सोडी हे गाणं सुरू करताच सगळे बॉलिवूडकर खुश झाले आणि त्यांनी या गाण्यावर नाचायला सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी संजूच्या या अचिव्हमेंटचं कौतुक केलं आहे. 5262.studios या इंस्टाग्राम हॅन्डलने संजूचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
गुलाबी साडी या गाण्याने संजूला रातोरात प्रसिद्धी मिळाली अन तो स्टार गायक बनला आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा अभिमान वाटतो. संजुच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, मराठी गाण्यावर सर्वांना नाचवलंस मानलं भावा तुला. तर दुसऱ्याने जस्टीन बीबरपेक्षा तरी चांगलं गायलास अशी कमेंट केली आहे तर एकाने कहर केलाय भाऊने अशी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.