अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची धाकटी लेक राधिका मर्चंट यावर्षी लग्नबेडीत अडकणार आहेत. येत्या जुलै महिन्यात दोघांचा लग्नसोहळा मुंबईत पार पडणार असून त्यापूर्वी त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनशी संबंधित नवीन अपडेट समोर आले आहे. पुन्हा एकदा दोंघाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन आयोजित केले जाणार आहे. या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचं लोकेशन खूपच प्रेक्षणीय आहे.
अनंत आणि राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग सेलिब्रेशन हे थेट समुद्राच्या मधोमध २८ ते ३० मे दरम्यान एका क्रूझवर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ इटलीच्या बंदरातून निघेल आणि हा प्रवास दक्षिण फान्समध्ये संपेल. दक्षिण फ्रान्समधील समुद्राच्या मध्यभागी क्रुझवर हा आनंदोत्सव साजरा होणार आहे. या सेलिब्रेशनसाठी ८०० पाहुण्यांना आमंत्रित केले जाणार आहे. सध्या या प्री-वेडिंग बॅशची जय्यत तयारी सुरू असून या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी जहाजावर सुमारे ६०० कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
अनंत आणि राधिका मर्चंटचे पहिले प्री-वेडिंग सेलिब्रेशन १ ते ३ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले होते ज्यासाठी सुमारे १,२०० कोटी रुपयांचा खर्च झाला होता. यावेळी देखील मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या लेकाच्या आणि सुनेच्या प्री-वेडिंगमध्ये कोणतीही कसर सोडणार नाहीत हे नक्की.