बॉलीवूड अभिनेत्री व अभिनेता चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडेने मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. काल धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनन्या पांडेने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनन्याने धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन घरात प्रवेश केला आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट शेयर करत तिच्या नवीन घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. अवघ्या २५ व्या वर्षी अनन्याने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं आहे.
अनन्याने इन्स्टाग्रामवर पूजा करतानाचा एक फोटो व एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनन्या सुंदर दिसत आहे. “माझे स्वतःचे घर !! नवीन सुरुवात करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि शुभेच्छांची गरज आहे !!! सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा,” असे कॅप्शन अनन्याने फोटोंना दिले आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्स करून सर्वजण तिला शुभेच्छा देत आहेत.
अनन्याच्या फोटोंवर टायगर श्रॉफ, शिल्पा शेट्टी, परिणीती चोप्रा, दिया मिर्झा, फराह खान, शनाया कपूर, गौहर खान, सान्या मल्होत्रा, महीप कपूर, इरा खान, गुनीत मोंगा यांनी कमेंट करत नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहे. या फोटोंवर तिची आई भावना पांडे यांनीही कमेंट केली आहे.
भावना पांडेंनी लेकीच्या फोटोवर ‘तुझा अभिमान वाटतो,’ ‘शाइन ऑन’ अशा दोन कमेंट्स केल्या आहेत. सध्या अनन्याचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, अनन्या पांडेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ऑगस्टमध्ये तिचा ‘ड्रीमगर्ल २’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात तिने आयुष्मान खुरानाबरोबर काम केलं होतं. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट हिट ठरला होता.