मराठी सिनेसृष्टीत सध्या बायोपिकचं पीक आलं आहे. ठाण्याचा ‘‘ढाण्या वाघ’’ आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’’ आणि त्यानंतर ‘‘धर्मवीर २: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसात सात कोटींची कमाई केली आहे. आनंद दिघे यांच्यानंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध राजकीय नेत्यावरील बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव हा या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे.
वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘‘कर्मयोगी आबासाहेब’’ असं सिनेमाचं नाव असून हा सिनेमा २५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव या सिनेमात गणपतराव देशमुख यांच्या प्रमुख भूमिकेत आहे. गणपतरावांच्या प्रमुख भूमिकेतील अनिकेतचा पहिला लूक देखील शेअर करण्यात आला आहे.
या सिनेमात दमदार स्टारकास्ट आहे. अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
गणपतराव देशमुख यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचं योगदान दिलं. दोन वेळा कॅबिनेट मंत्रीपद भूषवण्याची संधी त्यांना मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमातून घेण्यात आला आहे.