रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांचा अनुपमा हा शो चाहत्यांना नेहमीच आवडतो. दीर्घकाळ टीआरपी मध्ये या शोने आपले स्थान अव्वल राखले आहे. विशेषत: अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली सर्वांची आवडती बनली आहे, तिची फॅन फॉलोइंग देखील खूप मोठी झाली आहे.
रुपाली जरी आज टीव्हीची मोठी स्टार बनली असली, तरीही एक काळ असा होता जेव्हा तिला खूप संघर्ष करावा लागला होता. पण अनुपमानंतर तिचे आयुष्य बदलले. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान स्वतः रुपाली गांगुलीने तिची संघर्षकथा शेअर केली.
रुपालीने अलीकडेच सांगितले की तिच्या वडिलांचे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. " वडीलांचे सर्व चित्रपट एकामागून एक फ्लॉप झाले. त्यावेळी घर आणि दागिने गहाण ठेवून चित्रपट बनवले जात होते. वडीलांचे चित्रपट चालले नाहीत. त्यांचे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सर्व काही संपले. सर्व गोष्टी विकल्यामुळे आम्ही गरीब झालो. ."
रुपाली पुढे म्हणाली, "मी त्यावेळी थिएटर करायचे. माझे पहिले नाटक आत्ममंथन होते. पैसे नसल्यामुळे मी पृथ्वी थिएटरमध्ये जायचे. प्रत्येक शोसाठी मला 50 रुपये मिळायचे आणि त्यातच मी जगायचो. माझे शेवटचे नाटक राकेश बेदीसोबत होते.
रुपालीने मुलाखतीत तिला अनुपमा शो कसा मिळाला आणि सर्व काही कसे बदलले याबद्दल सांगितले. "मी नाटकाच्या शेवटच्या शोसाठी इंदौरला गेले होते. मी महाकाल मंदिरात बसले, तेव्हा मला अनुपमाच्या निर्मात्यांचा फोन आला. त्यांनी मला ऑडिशन देण्यास सांगितले. मी रात्री 12 वाजता माझ्या ऑडिशनचा व्हिडिओ शूट केला आणि त्यांना पाठवला. दुसऱ्या दिवशी मी मंदिरात बसले होते तेव्हा त्यांनी पुन्हा फोन केला. त्यांना लगेच मला भेटायचे होते. मी त्यांना सांगितले की मी आता इंदौरला आहे आणि दोन दिवसांनीच भेटू शकते."
यानंतर रुपाली मुंबईत परतल्यावर तिने निर्मात्यांची भेट घेतली आणि शोसाठी तिची निवडही झाली. लोकांना हा शो इतका आवडला की त्याने सर्व टीआरपी रेकॉर्ड तोडले. अनुपमा घराघरात लोकप्रिय झाली. आज रुपाली गांगुली टेलिव्हिजनमध्ये एक मोठे नाव बनले आहे आणि तिची कमाई करोडोंमध्ये आहे.