गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर आज इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विरुष्काच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे.
अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला गोंडस मुलाला जन्म दिला. विराट-अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये या दोघांनी त्यांच्या बाळाचं नाव देखील सांगितलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या विरुष्काने त्यांच्या चिमुकल्या बाळाचं नाव अकाय (Akaay) असं ठेवलं आहे.
विराट-अनुष्का पोस्ट शेअर करत लिहितात, “तुम्हा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारीला आमच्या घरी चिमुकल्या ‘अकाय’चं आणि वामिकाच्या लहान भावाचं आगमन झालं. आयुष्यातील या सर्वात सुंदर प्रसंगी तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्याबरोबर कायम असूद्या. याशिवाय आमच्या प्रायव्हसीचा आदर करा ही विनंती.”
विराट कोहली व अनुष्का शर्माने त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव ‘अकाय’ असं ठेवलं आहे. या जोडप्याने लेकाचं नाव जाहीर केल्यावर सोशल मीडियावर या अनोख्या नावाचा अर्थ काय बरं असेल? याची चर्चा रंगली आहे. हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’ असा होतो. ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. याशिवाय तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र (shining moon) असा होतो.
दरम्यान, अनुष्का शर्माने २०२१ मध्ये लेक वामिकाला जन्म दिला होता. लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. ती शेवटची २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात झळकली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का आई होणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर या विरुष्काने लेकाच्या जन्मानंतर पाच दिवसांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
आता लवकरच अभिनेत्री ‘चकदा एक्स्प्रेस’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)