सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला अन्न विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा हा व्हिडिओ आहे, ज्याच्या वडिलांचा मृत्यू झाला . दिल्लीतील एका मुलाच्या व्हायरल व्हिडिओवर अभिनेता अर्जुन कपूरने आपली प्रतिक्रिया दिली असून त्याला मदत करण्याची ऑफर दिली आहे.
आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये अर्जुन कपूरने खाद्यपदार्थ विक्रेत्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याच्या आणि बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची ऑफर दिली आहे.
दिल्लीचा रहिवासी असलेल्या 10 वर्षांच्या जसप्रीत सिंगची कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे. जसप्रीत सिंगच्या या इमोशनल व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, 10 वर्षांचा जसप्रीत सिंग त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर धैर्याने रोल्सचे दुकान चालवताना दिसत आहे.
जसप्रीतची जिद्द आणि मेहनत पाहून बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्या मुलाला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. जसप्रीतला सपोर्ट करत अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे - तो चेहऱ्यावर हसू घेऊन त्याच्या भावी आयुष्याकडे वाटचाल करत आहे. एवढ्या लहान वयात स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या या 10 वर्षाच्या चिमुरड्याच्या धैर्याला मी सलाम करतो. ज्याने त्यांच्या वडिलांचे काम त्यांच्या निधनानंतर अवघ्या 10 दिवसांनी उत्तम प्रकारे हाती घेतले. मला त्या मुलाला आणि त्याच्या बहिणीला त्यांच्या अभ्यासात मदत करायला आवडेल. कोणाला त्या मुलाचा ठावठिकाणा माहीत असल्यास कृपया मला कळवा.
वास्तविक, एका फूड ब्लॉगरने त्याच्या इंस्टाग्रामवर जसप्रीत सिंग नावाच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ जसप्रीतचा समर्पण दाखवतो, जो त्याच्या वडिलांचा स्ट्रीट साइड फूड स्टॉल चालवत आहे. त्याच्या वडिलांचे दहा दिवसांपूर्वीच निधन झाले. हा व्हिडिओ दिल्लीतील टिळक नगरमधील आहे.