३०-३५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली रामायण मालिका आजही तितकीच हिट आहे. या मालिकेत राम-सीतेची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया या कलाकारांना अजूनही प्रेक्षक विसरले नाहीयेत. टेलिव्हिजनवर गाजलेली ही जोडी आता मराठी सिनेविश्वात पदार्पण करतेय. या दोघांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार असून हे दोघे ‘वीर मुरारबाजी’ या सिनेमात काम करत आहेत.
निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्रज्ञ आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे.
पुरंदरच्या लढाईत अद्भुत पराक्रम गाजवणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची शौर्यगाथा वीर मुरारबाजी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. पुरंदरचा तह होऊ नये म्हणून मुरारबाजी यांनी प्राणाची बाजी लावली. त्यांच्या पराक्रमाने शत्रू सैन्यही थक्क झाल्याचं इतिहासात सांगितलं आहे.
आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास बघता यावा यासाठी आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभारली आहे. ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे.
दरम्यान अंकितने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली असून यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अंकितचं लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. सिनेमाच्या पोस्टरवरील अंकितच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुरारबाजींच्या लूकमधील अंकितच्या हातातील तलवार आणि शत्रूला लढाईसाठी आव्हान देणारी नजर, तगडी शरीरयष्टी चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, अरुण गोविल नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण सिनेमातही काम करत आहेत. या सिनेमात ते राजा दशरथाची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर त्यांचे या लूकमधील पोस्टर व्हायरल झाले होते. तर दीपिकाही बराच काळ कोणत्याही कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीस न आल्याने त्यांच्या कमबॅकसाठी सुद्धा प्रेक्षक उत्सुक आहेत.