रामायण या मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारुन अरुण गोविल यांनी खूप लोकप्रियता मिळवली. ही लोकप्रियता इतकी अफाट होती की लोक ३० वर्षांनी देखील त्यांना रामाच्या भूमिकेसाठीच मानतात. अरुण गोविल यांनी नुकतीच वाराणसीला भेट दिली. तेव्हा तिथे एका मुलाखतीत ते म्हणाले की रामायण हे प्रत्येकासाठी जीवन दर्शन प्रमाणे आहे. याचा समावेश अभ्यासक्रमात झालाच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिकवले गेलेच पाहिजे.
मुलाखतीत अरुण गोविल यांना प्रश्न विचारण्यात आला की सनातनी राष्ट्र किंवा हिंदु राष्ट्रासाठी रामायण प्रत्येक विद्यापीठात शिकवले जावे असे तुम्हाला वाटते का...? याचे उत्तर देताना ते म्हणाले की, 'रामायण आपल्या अभ्यासक्रमात असलेच पाहिजे.'
ते पुढे म्हणाले की, 'रामायणाला धार्मिक म्हणण्याबाबत मी समर्थन देत नाही. रामायण हे आपले जीवनाचे दर्शन आहे. केवळ आपणच नाही तर सर्वांनी कसे जगले पाहिजे हे रामायण सांगते.
अभिनेता पुढे म्हणाले की, रामायण नाती कशी जपायची, लोकांनी किती संयम ठेवला पाहिजे हे शिकवते. 'नाती कशी असावीत? किती धीर धरावा? एखादी व्यक्ती शांती कशी मिळवू शकते? ते फक्त सनातनी लोकांसाठी नसून हे प्रत्येकासाठी आहे.
रामानंद सागर यांचे 'रामायण' १९८७ मध्ये प्रसारित व्हायचे. यामध्ये अरुण गोविल यांनी श्रीरामाची भूमिका साकरलेली, तर दीपिका चिखलिया यांनी सीता आणि सुनील लाहिरींनी लक्ष्मणाची भूमिका साकारली होती.