बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले वयाच्या नव्वदीतही आपल्या आवाजानं रसिकांच्या मनावर गारुड घालतात. त्यांनी आजवर फक्त बॉलिवूडचं नाही तर इतर भाषांत देखील अनेक गाणी गायली आहे. आता आशा भोसलेंनंतर त्यांची पुढची पिढी देखील चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. आशा भोसले यांच्यासोबत एक व्यक्ती नेहमी लक्ष वेधून घेते ती म्हणजे त्यांची नात. आशा भोसले यांची नात जनाई भोसले खूपच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता आशा भोसलेंची नात जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. जनाईच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा झाली आहे.
फिल्म इंडस्ट्रीतील इतर स्टारकिड्सप्रमाणे आता जनाई देखील चित्रपटसृष्टीत आपलं नशीब अजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. जनाई खूप सुंदर दिसते. आशा भोसलेंसोबत ती अनेक कार्यक्रमात सहभागी झालेली दिसते. तिचे फोटो देखील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. जनाई सुंदर दिसतेच शिवाय तिचा आवाजही आपल्या आजीप्रमाणे सुंदर आहे. आता जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. जनाईचा पहिला चित्रपट हा इतिहासकालीन असून त्याची नुकतीच घोषणा झाली आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप सिंग येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ असं आहे. या सिनेमातच जनाई झळकणार आहे. जनाई या चित्रपटात शिवरायांच्या पत्नीची म्हणजेच महाराणी सईबाई यांची भूमिका साकारणार आहे. आशा भोसले यांच्याप्रमाणेच जनाई ही एक उत्तम गायिका आहे. तिला संगीताची आवड आहे. शिवाय, ती एक उत्तम डान्सर देखील आहे. जनाईच्या या गुणांचाच विचार करून, राणी सईबाई भोसलेंच्या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.
जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. जनाईने अनेक म्युझिक अल्बममध्ये आवाज दिला आहे. तिने ‘तेरा ही एहसास है’सह अनेक गाणी गायली आहेत. आता जनाईला सईबाईंच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.