Close

‘लगान’ मधील भुवनच्या भूमिकेसाठी आशुतोष गोवारीकर यांची पहिली पसंती होती अभिषेक बच्चन… (Ashutosh Gowariker Revealed Abhishek Bachchan Rejected Lagaan Before Aamir Khan)

आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ या चित्रपटाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आशुतोष गोवारीकर यांचा हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. आमिर खानने या चित्रपटात भुवनची भूमिका साकारली होती. पण, या भूमिकेसाठी आशुतोष गोवारीकर यांची पहिली पसंती आमिर खान नव्हे, तर अभिषेक बच्चन होता. लगानला २२ वर्षे पूर्ण झालीत, त्यानिमित्ताने गोवारीकर यांनी हा खुलासा केला.

गोवारीकर यांनी सांगितलं की त्यांना चित्रपटात अभिषेक बच्चनला घ्यायचं होतं, पण शेवटी त्यांना आमिर खानला ही भूमिका ऑफर करावी लागली. हा चित्रपट करण्यासाठी अभिषेकची खूप मनधरणी केली, पण तो तयार झाला नाही. अभिषेकला वाटत होतं की तो या पात्रात बसणार नाही.

अभिषेक एका मुलाखतीत म्हणाला होता, “लगानसारख्या मोठ्या चित्रपटासाठी मी खूप नवीन आणि लहान होतो. अर्थात, हा चित्रपट खूप मोठा आहे याची मला जाणीव होती, पण मी त्याचा भाग व्हायला तयार नव्हतो.” आमिरने ती भूमिका उत्तम साकारली होती, त्यामुळे अभिषेकने आनंद व्यक्त केला होता. हा चित्रपट नाकारला याबद्दल मनात कोणतीही खंत नसल्याचंही तो म्हणाला होता.

दरम्यान, ‘लगान’च्या वर्धापनदिनानिमित्त आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाच्या सेटवरील अनेक जुने फोटो शेअर केले होते. २२ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळी दिशा देणारा चित्रपट आहे.

Share this article