१८ मार्चपासून स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली. नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येणार आहेत. मालिकेच्या प्रोमोना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून या मालिकेतल्या आणखी एका सदस्याची ओळख नव्या प्रोमोतून होणार आहे. हा नवा सदस्य म्हणजे सौमित्र रणदिवे. सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष पत्की सौमित्रची भूमिका साकारणार असून तो जवळपास ८ वर्षांनी स्टार प्रवाहसोबत काम करणार आहे.
सौमित्र ही भूमिका साकारण्यासाठी आशुतोष फारच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, ‘स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेत मी एक छोटी भूमिका साकारली होती. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. सौमित्र रणदिवे हा वकील आहे. अतिशय हुशार, महत्वाकांक्षी आणि व्यावहारिक. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला आणि नात्यांचं महत्त्व जाणणारा. मी याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळं असं हे पात्र आहे. मालिकेची टीम उत्तम आहे त्यामुळे काम करताना धमाल येतेय अशी भावना आशुतोषने व्यक्त केली.’
घरोघरी मातीच्या चुली या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हण्टलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतिक्षा मुणगेकर, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.