Close

सातच्या आत घरात… (At Home Within Seven…)

  • दादासाहेब येंधे
    खरं तर ‘सातच्या आत घरात’ या संकल्पनेतून मुलगी घडते आणि बिघडतेही. हा नियम पालकांनी मुलींवर लादण्याआधी जर मुलींनीच स्वतःला लागू केला तर, सात वाजल्यानंतर पडणार्‍या काळोखाचं खरं रूप त्यांनाही समजेल.
    दारावरची बेल वाजली. आईनं दार उघडलं. दारात नलिनी उभी होती. आज तिला नेहमीपेक्षा क्लासवरून यायला उशीर झाला होता. “काय हे नलिनी, किती उशीर…! अगं एक तास उशिरा आलीस. जीव टांगणीला लागला होता गं माझा. कुठे गेली होतीस?” दारातच आईनं ओरडून नलिनीला रागवायला सुरुवात केली. नलिनी मात्र अत्यवस्थ… पायातली चप्पल रॅकमध्ये ठेवत… “एक्स्ट्रा क्लास घेतला गं सरांनी आज, परीक्षा तोंडावर आलीय नं.”
    “अगं पण हे घरी आम्हाला कसं कळणार? सात वाजेपर्यंत घरी येतेस तू म्हणून काळजी वाटली. जा फ्रेश हो जा. ” आई स्वतःचा राग शांत करत म्हणाली. नलिनी तिच्या खोलीत गेली. तिला तिच्या आईने घातलेला “सातच्या आत घरात” हा नियम मुळात माहीतच नव्हता. आईने मला संध्याकाळचा क्लास का लावला? क्लास बरोबर वेळेतच संपेल असे कधी होते का?
    रस्त्यात गर्दी असली, एखादा अपघात झाला असेल तर कसं बरं वेळेत यायला मिळेल? ‘सातच्या आत घरात’ कशासाठी… का म्हणून अशी अडवणूक … मी एक मुलगी आहे म्हणून की सातच्या नंतर रात्र होते म्हणून? का तिचा माझ्यावर विश्‍वास नाही म्हणून ? असे अनेक प्रश्‍न नलिनीला राहून राहून सतावत होते.
    16 वर्षांची जेमतेम, सरळ, साधी नलिनी बी. कॉमला होती. तिने बँकेत नोकरी करावी अशी तिच्या आईची इच्छा. विचार करतच नलिनी कपडे बदलून बाहेर आली.
  • मायलेकींचा वाद
    “अगं, नलिनी पप्पांना यायला उशीर होणार आहे. आपण जेवूया का? तुझ्या आवडीची पालकाची भाजी आणि व्हेज बिर्याणी केली आहे. चल बस. ” नलिनीचे आईच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. ती तिच्याच विचारत होती. पण तिने आईला एक प्रश्‍न विचारला, “आई, आज पप्पा उशिरा येणार आहेत ना. मग तुला पप्पांची काळजी नाही वाटत का?”
    “नलू, काय हा उलट प्रश्‍न तुझा. अगं, फोन आत्ताच येऊन गेला त्यांचा, वाट बघू नको म्हणून. ऑफिसमध्ये कामं आहेत म्हणे भरपूर. होतो कधी कधी उशीर.”
    “मग मलाही दे ना मोबाईल. मग मी सुद्धा तुझ्या संपर्कात राहीन. मी कुठे आहे, कोणासोबत आहे. कधी घरी येईन… वगैरे वगैरे.”
    “नलू…ऽऽ!!! ”आई जोरात ओरडली. नलू न जेवताच ताटावरून उठून निघून गेली. खरं तर हा मायलेकींचा वाद आपल्याला प्रत्येक घरात बघावयास मिळतो. नलिनीच्या वयातल्या मुलींना खरं तर स्वातंत्र्य हवं असतं. बाहेरून घरी परतल्यानंतरही नुसता प्रश्‍नांचा भडिमार. स्वच्छंदी जगण्यामागे मुलींचा कुठलाच स्वार्थ नसतो; पण त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना करू द्यावं एवढीच त्यांची अपेक्षा असते.
    पालकांच्या मनात मात्र मुलींना स्वातंत्र्य देण्यामागे एक प्रकारची भिती दडलेली असते. या अपेक्षा आणि भीतीमध्ये नाजूक मनाची मात्र कोंडी होते. जडणघडणीच्या अशा नाजूक वयात पालकांना संस्कारी मुलगी घडवायची असते, तर मुलींना एक अनामिक क्षितिज साद घालत असतं. त्या क्षितिजापलीकडे उडण्यासाठी खरं तर त्यांच्या पंखात ताकद आलेली नसते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक खासगी अबोल जागा तयार केलेली असते. तिथे फक्त सुगंध राहतो मैत्रीचा.
  • नात्यातील पारदर्शकता
    कधी कधी तिथे भाळण्याचे क्षण येतात जे त्यांना सांभाळताही येत नाहीत. परिणामी घुसमट, त्रागा, तडजोड या धुक्याचं सावट पसरतं. तारुण्य हरविलेलं अंगण वाट्याला येतं. जिथे फक्त आणि फक्त एकटेपणा आणि पश्‍चात्तापाचा सडा पडतो. मग काय चुकतं पालकांचं, जर त्यांनी थोडीशी लुडबुड केली, काही निर्बंध घातले तर?
    खरं तर ‘सातच्या आत घरात’ या संकल्पनेतून मुलगी घडते आणि बिघडतेही. हा नियम पालकांनी मुलींवर लादण्याआधी जर मुलींनीच स्वतःला लागू केला तर, सात वाजल्यानंतर पडणार्‍या काळोखाचं खरं रूप त्यांनाही समजेल.
    पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे कोचिंग क्लासेसच्या वेळाही रात्री आठ-नऊपर्यंतही असतात. पालकांनाही मुलींना बाहेर पाठविण्याशिवाय पर्याय नसतो, पण जर एक प्रामाणिक विश्‍वास पालकांनी मोकळ्या संवादातून मुलींवर टाकला तर काही बंधने घालण्याची आणि संशयाने प्रश्‍न विचारण्याची वेळ त्यांच्यावरही येणार नाही. मुली मोकळ्या मनाने घराबाहेर पडू शकतील. ‘नात्यातली पारदर्शकता’ ही बोचणारी, दिसणारी नव्हे तर एकमेकांना समजून-उमजून घेणारी असावी. ही मान्यता जर प्रत्येक घरातील प्रत्येक मनाला मिळाली तर ‘सातच्या आत घरात’ हा नियम नलिनीच काय, कोणत्याच घरात राहणार नाही.

Share this article