Close

सुखाची प्रचिती देणारी बेडरूमची सजावट (Bed Room Decor Ideas)


प्रवेश करता क्षणी सुखाची-समाधानाची प्रचिती यावी, अशी असायला हवी आदर्श बेडरूमची सजावट. त्यासाठी या 15 टिप्स-

बेडरूम म्हणजे शयनकक्ष अर्थात विसाव्याची, आरामाची जागा. घरातील या खोलीमध्ये आपण आपल्या जीवनातील अतिशय खासगी क्षण घालवतो. त्यामुळे
येथील सजावट करताना, आपल्याला काय अपेक्षित आहे, त्याप्रमाणे येथील सजावट केली पाहिजे. बेडरूममधील सजावट अशी असावी की तिथे प्रवेश करता क्षणी सुखाची, समाधानाची प्रचिती यायला हवी.

1 आपल्या आयुष्यात रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगांवरून आपला मूड ठरतो. रंगांमध्ये जागा प्रसन्न ठेवण्याची जादू असते. तेव्हा बेडरूमच्या सजावटीसाठी रंग कोणते वापरावेत, ते प्रथम जाणून घेऊ. बेडरूमसाठी साधारणपणे गुलाबी, पिच, आकाशी अशा सौम्य रंगांचा वापर करावा. गडद रंग आवडत असतील, तर लाल, जांभळा यांसारख्या रंगांचा वापरही करता येईल.

2बेडरूमसाठी लाल रंगाची निवड करायची असेल, तर लक्षात ठेवा की, बेडरूमची केवळ एकच भिंत लाल रंगाने रंगवा आणि इतर सजावट लाल रंगांच्या वस्तूंनी करा. उदाहरणार्थ- बेडशीट, पडदे, उशीची अभ्रे इत्यादी लाल रंंगाचं घेता येईल.

3 बेडरूमच्या एखाद्या भिंतीस टेक्श्‍चर पेंटिंग करून नवीन लूक देता येईल.

4 बेडरूममध्ये फुलांची सजावट हवी असल्यास, एखाद्या भिंतीस फुलांची नक्षी असलेला वॉल पेपर लावता येईल. फुलांची कल्पना पूर्णतः साकारण्यासाठी आवडीप्रमाणे फुलांची प्रिंट असलेली बेडशीट, उशीची अभ्रे आणि पडदे अशीही योजना करता येईल.

5 घरातील दिवाणखान्याप्रमाणे बेडरूम केवळ आकर्षक नव्हे, तर मनाला आनंद देणारी ठरेल याप्रमाणे तेथील सजावट असावी. रूममध्ये जाता क्षणी ताणतणाव, काळजी, द्वेष, मत्सर असं सगळं विसरून जाऊन केवळ शांत, मोकळं वातावरण असायला हवं.

6 काही खास दिवसांसाठी तुम्ही सिल्क, सॅटिन अशा फॅब्रिकच्या बेडशीट, पडदे, उशांची कव्हरं वापरून वातावरणात थोडासा वेगळेपणा आणू शकता.

7 फुलांची आवड असल्यास, तुम्ही बेडरूममध्ये ताज्या फुलांची सजावट करून वातावरण निर्मिती करू शकता. तसंच खोलीत प्रसन्नता आणू शकता.

8 बेडरूममध्ये तुम्ही विश्रांतीचे, खाजगी क्षण घालवणार आहात. तेव्हा बेडरूममधील प्रकाशाचं नियोजन करताना, हे अवश्य लक्षात घ्या.

9 हल्ली बाजारात स्टेनलेस स्टील, तांबे इत्यादी धातूंचे; तसेच वेगवेगळ्या रंगांचे व डिझाईन्सचे अँटिक लॅम्प उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या पसंतीने बेडरूमला शोभून दिसतील अशा प्रकारचे लॅम्प लावून बेडरूममधील वातावरण रोमँटिक बनवू शकता.

10 सध्या ट्रेंडी आणि डेकोरेटिव्ह लाइट असलेल्या सिलिंग फॅनलाही बरीच मागणी आहे. बेडरूम सजवताना तुम्ही याचाही वापर करू शकता. बेडरूमच्या एका भिंतीवर दोघांचा रोमँटिक फोटो लावता येईल. असं केल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

11 झोपल्यानंतर सफेद रंगाचं छत जर तुम्हाला खटकत असेल तर छताला बॉर्डर, दिवे किंवा एखाद्या सौम्य रंगाने सजवा. छत अर्थात, सिलिंग म्हणजे घराची पाचवी भिंत असते, त्यामुळे तीदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही.

12 बेडरूम मोठं असेल आणि तुम्हाला नटण्यामुरडण्याची आवड असेल, तर बेडरूममध्ये तुम्ही वॉक इन वॉर्डरोब बनवू शकता. हे वॉर्डरोब म्हणजे एक प्रकारे तुमच्या खासगी वस्तूंची खोलीच म्हटली तरी चालेल. इथे तुम्ही तुमच्या कपड्यांपासून ते दागिने, चपला इत्यादी सर्व काही व्यवस्थित सुटसुटीत रचून ठेवू शकता. इथेे तुम्हाला कपड्यांची निवड करण्यासाठी, मनासारखं तयार होण्यासाठी एकांत मिळेल.

13 लिखाणाची किंवा वाचनाची आवड असेल, तर अशा व्यक्तींसाठी मोठं बेडरूम म्हणजे पर्वणीच. बेडरूममध्ये आपल्या आवडीच्या पुस्तकांची छोटीशी लायब्ररी बनवता येईल. त्यामुळे तुमच्या छंदाचा इतरांना त्रास होणार नाही. तसंच इतरांमुळे तुमच्या वाचनात व्यत्ययही येणार नाही.

14 आपला छोटासा बेडरूम मोठा भासावा यासाठी तुम्ही रॉट आयर्नचा बेड आणू शकता. हा कमी जागा घेतो आणि खोलीस समकालीन लूकही देतो. लाकडी बेडच्या तुलनेत हा कमी किमतीचा, तसंच विविध रंगांत आणि स्वरूपात उपलब्ध असतो. परंतु, मेटलचा बेड खरेदी करताना तो चांगल्या दर्जाचा घ्या, जेणेकरून त्यास गंज लागणार नाही. तसंच लहान मुलांना त्यामुळे इजा होण्याची भीतीही राहणार नाही.

15 बेडरूम लहान असेल, तर तुम्ही सिलिंग आणि भिंतींसाठी सौम्य रंगांचा वापर करू शकता.
अनेक प्रकारे वापरता येऊ शकेल, अशा फोल्डेबल फर्निचरची निवड करा. बेडरूममध्ये नको त्या सामानाची अडगळ करू नका. सामान जास्त असल्यास, ड्रॉवर्स असलेला लाकडी बेड उपयुक्त ठरेल.
घराच्या बाबतीत आपल्या मनात एक हळवा कोपरा असतो. त्यामुळे वेळोवेळी घर स्वच्छ ठेवणं, घरासाठी आवश्यक वाटणार्‍या गोष्टींची खरेदी करणं इत्यादी आपण करतच असतो. आणि घराचं घरपण जपण्यासाठी हेच पुरेसं आहे. विनाकारण महागड्या वस्तूंच्या वापराने सजावट करून घराला बोजडपणा आणू नका.

Share this article