Close

उन्हाळ्यात तूप खावे का? (Benefits of Ghee in Summer)

उन्हाची दाहकता कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. अशा वातावरणात तूप खाल्ल्याने काय होते? उन्हाळ्यात तूप खाणे चांगले आहे की नाही? जाणून घेऊया.

गरमागरम वरण भातासोबत साजूक तूप खायला सगळ्यांनाच आवडते. सर्वांना माहीत आहे की, तूप केवळ चवीलाच नाही तर त्याचे अनेक फायदेही आहेत. हिवाळ्यात, बरेच लोक तूप आवर्जून खातात. पण आता भयंकर ऊन आहे. गरमी वाढली आहे. यावेळी तूप खाणे योग्य आहे का?

उन्हाळ्यात तूप खाल्ल्याने शरीरावर विविध परिणाम होतात. त्यापैकी बहुतेक खूप चांगले आहेत. असे आयुर्वेद शास्त्र सांगते. त्यामुळे उन्हाळ्यात तूप खाण्यात काहीच गैर नाही. उन्हाळ्यात तूप खाण्याचे काय फायदे आहेत ते पाहुया.

थकवा कमी करते : शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी आरोग्यदायी पदार्थ खाणे आवश्यक आहे. उष्ण ऋतूमध्ये थकवा जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे यावेळी तूप खाणे चांगले. वरणात किंवा भाजीत एक चमचा तूप टाकून खाऊ शकता. तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते : तूप प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. तूप खाल्ल्याने विविध संक्रमण आणि आजार टाळणे सोपे होते. तुपामध्ये विविध जीवनसत्त्वे असतात. ते रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. उन्हाळ्यात विविध कारणांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे यावेळी तूप खाणे फायदेशीर ठरते.

डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते : उन्हाळ्यात घाम येणे शरीराला कोरडे करते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. तूप शरीरात आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. पोषणतज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता तूप भरून काढते. इतकेच नाही तर तुपामुळे त्वचेलाही फायदा होतो. तूप खाल्ल्याने त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होतो.

पचन सुधारते : रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. आयुर्वेद सांगतो, तूप अन्नातून पोषक तत्वे काढण्यासाठी उत्तम काम करते. त्यात ब्युटीरिक अॅसिड भरपूर असते जे आतड्याचे कार्य सुधारते. कोणत्याही कार्बोहायड्रेट अन्नामध्ये तूप मिसळल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर आहे.

शरीर थंड ठेवू शकते : तुपाचे सेवन केल्याने शरीर थंड राहते असाही अनेकांचा समज आहे. तुपामुळे जळजळ कमी होते तसेच शरीर थंड राहते, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. या कारणास्तव ते उन्हाळ्यात तूप खाण्याचा सल्ला देतात.

Share this article