Close

शिव ठाकरेने पर्यावरणवादी या नात्याने प्लॅस्टीक बेंचचे केले उद्घाटन (‘Big Boss’ Fame Actor Shiv Thakare Unveiled A Plastic Bench As A Conservationalist)

गणेशोत्सवाच्या काळात आपले सण हे पर्यावरणपूरक असावेत यासाठी देशातील नावाजलेले रेडियो नेटवर्क बिग एफएम सातत्याने प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून बिग एफएमने 'बिग ग्रीन गणेशा' मोहिमेची सुरूवात केली होती. यंदाच्या या मोहिमेचा समारोप नामवंत व्यक्तिमत्व शिव ठाकरे याच्या उपस्थितीत करण्यात आला.  शिव ठाकरे याने प्लॅस्टीकचा पुनर्वापर करून तयार करण्यात आलेला बेंच मुंबईतील जुहू भागात स्थापित केला. शाश्वत पर्यावरणाला हातभार लावण्यासाठीच्या बिग एफएमच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता.  इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशनच्या सहकार्याने बिग एफएमने प्लॅस्टीक गोळा करण्यासाठी एक मोहीम राबवली होती, यातून जमा झालेल्या प्लॅस्टीकमध्ये बेंच तयार करण्यात आले आहेत.

मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईतील 20 निवासी कल्याण संघटनांमध्ये ड्रॉप बॉक्स लावण्यात आले होते. नागरिकांना या ड्रॉप बॉक्समध्ये वापरलेलं प्लॅस्टीक जमा करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आलं होतं. या प्लॅस्टीकचा वापर करून 5 बेंच तयार करण्यात आले होते. यातला शेवटचा बेंच, मुंबईतील जुहू भागामध्ये शिव ठाकरे आणि आर.जे.राणी यांनी मिळून स्थापित केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिव ठाकरेची लोकप्रियता पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शाश्वत पर्यावरणासाठी बिग एफएम करत असलेल्या प्रयत्नांचे शिव ठाकरे याने कौतुक केले. त्याने त्याच्या चाहत्यांना आणि उपस्थितांना प्लॅस्टीकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना शिव ठाकरे याने म्हटले की "उत्सव हे महत्त्वाचे आहेत, मात्र या उत्सवांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी मी अशा उपक्रमांना हातभार लावून माझ्यापरीने प्रयत्न करत असतो. बिग एफएमने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून हरीत आणि शाश्वत पर्यावरणासाठी तो महत्त्वाचा आहे. छोट्या-छोट्या गोष्टींचाही मोठा प्रभाव पडतो. उदाहरण द्यायचं झालं तर गोळा केलेल्या प्लॅस्टीकचा वापर करून बेंच तयार करण्यात आले. हा कल्पक आणि चांगला प्रयत्न आहे. यामुळेच मला या मोहिमेत सहभागी होत असल्याबद्दल आनंद वाटत असून मी माझ्या सगळ्या चाहत्यांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करतो."

Share this article