‘बिग बॉस मराठी’चा बहुचर्चित पाचवा सीझन आजपासून ( २८ जुलै ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना काय-काय ट्विस्ट पाहायला मिळणार हे ग्रँड प्रीमियर सोहळ्यात स्पष्ट होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ची घोषणा झाल्यावर यंदा या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, याबरोबरच ‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं घर कसं असेल याची देखील प्रत्येकाच्या मनात आतुरता होती. अखेर ही प्रतीक्षा आता संपली असून ‘बिग बॉस’च्या घरचा Inside व्हिडीओ प्रेक्षकांसमोर आलेला आहे.
‘Bigg Boss Marathi’च्या घरात एन्ट्रीलाच भव्य प्रवेशद्वार आहे. यानंतर आपण लिव्हिंग एरियामध्ये पोहोचतो. प्रशस्त अशा हॉलमध्ये स्पर्धकांना आरामदायी अशा आधुनिक फर्निचरची निर्मिती करण्यात आली आहे. यंदा कॅप्टन रुम व बेडरुमला निळ्या व जांभळ्या रंगाच्या थीममध्ये सजवण्यात आलं आहे. कॅप्टन रुमला अतिशय ड्रिमी लूक देण्यात आला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घराची झलक ‘कलर्स मराठी वाहिनी’ने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यंदा घरातील किचन मॉर्डन सुख-सुविधांनी सुसज्ज असं आहे. याशिवाय स्पर्धकांना वेळ घालवण्यासाठी व टास्क खेळण्यासाठी प्रशस्त असं गार्डन देण्यात आलं आहे. Bigg Boss Marathi च्या घरात यंदा बाल्कनी असणार आहे. ही बाल्कनी रॉयल सोफे व जंगल थीमनुसार सजवण्यात आल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काचेच्या महालाप्रमाणे बाथरुम डिझाइन करण्यात आलं आहे. बाथरुमच्या दरवाजात स्पर्धकांना गप्पा मारण्यासाठी एक सोफा ठेवण्यात आला असून इतर सर्वत्र काचेची सजावट करण्यात आली आहे. गार्डन एरियामध्ये खास स्विमिंग पूल सुद्धा तयार करण्यात आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या घरावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत पार पडलेल्या पर्वांबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे, दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे, तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम, तर चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं होतं. आता या नव्या पाचव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.