Close

बिग बॉस ओटीटी 2’च्या ग्रँड फिलानेसाठी अवघे काही तास शिल्लक… (Bigg Boss OTT Season 2 Grand Finale)

अवघ्या दीड महिन्यांपूर्वी सुरू झालेला ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ आता अंतिम टप्प्यात आला आहे. ‘बिग बॉस’ या खेळाला १०० दिवसांची मर्यादा असली, तरी ओटीटी सीझनला मात्र हा नियम लागू पडत नाही. अवघ्या ५७ दिवसांत हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज (१४ ऑगस्ट) या शोचा महाअंतिमसोहळा पार पडणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या ग्रँड फिलानेसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या सोहळ्यात स्पर्धेत टिकून राहिलेल्या स्पर्धकांची तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. पूजा भट्ट, बेबिका धुर्वे, एल्विश यादव, मनीषा राणी किंवा अभिषेक मल्हान यापैकी एक स्पर्धक या शोची ट्रॉफी जिंकणार आहे.

अंतिम सोहळ्यापर्यंत या स्पर्धेत टिकून राहिलेल्या सगळ्याच स्पर्धकांच्या चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. या शोच्या प्रत्येक टास्कमध्ये सुरुवातीपासून ते आतापर्यंत सगळ्याच स्पर्धकांनी आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवली आहे. जिओ सिनेमाचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी २’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज झाला आहे. येत्या काही तासांतच या शोला दुसऱ्या सीझनचा विजेता मिळणार आहे.

पूजा भट्ट, बेबिका धुर्वे, एल्विश यादव, मनीषा राणी आणि अभिषेक मल्हान या पाच जणांपैकी कोणीतरी एक स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणार आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी चाहतेसुद्धा जोरदार वोटिंग करत आहेत. या सिझनचा विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावरही विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

अविनाश सचदेवच्या मते अभिनेत्री पूजा भट्ट या सिझनची विजेती ठरू शकते. पूजाने हा सिझन जिंकावा अशी त्याची इच्छा आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री पाहायला मिळाली. घरातील अनेक टास्कदरम्यान दोघांनी एकमेकांची साथ दिली होती. म्हणूनच अविनाशने पूजा भट्टचं नाव विजेतीसाठी सुचवलं आहे. तर ग्रँड फिनालेच्या आठवड्यातच घराबाहेर पडलेली स्पर्धक जिया शंकरने दोन स्पर्धकांची नावं घेतली आहेत. अभिषेक मल्हान किंवा एल्विश यादव या दोघांपैकीच एकाने हा सिझन जिंकावा, अशी इच्छा जियाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही याच दोघांच्या नावांची चर्चा आहे.

शोदरम्यान एल्विश यादव आणि जिया शंकर यांच्यात बरेच वाद झाले होते. मात्र शेवटच्या आठवड्यात त्यांच्यात चांगली मैत्री झाली. दोघांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला होता. तर अभिषेक मल्हान आणि जिया हे सिझनच्या सुरुवातीपासूनच एकमेकांच्या बाजूने होते. या दोघांमधील केमिस्ट्रीला पाहून चाहत्यांनीही त्यांना ‘अभिया’ असं नाव दिलं होतं.

बिग बॉसच्या घरातून सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये बाद झालेली स्पर्धक आकांक्षा पुरी हिनेसुद्धा अभिषेक मल्हानचं नाव विजेत्यासाठी सुचवलं आहे. “अभिषेकने संपूर्ण सिझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सुरुवातीपासून आमच्यात चांगली मैत्री होती. मात्र नंतरच्या खेळीदरम्यान त्यात फूट पाडली गेली. माझ्याबद्दल काही अशा गोष्टी बोलल्या गेल्या, ज्यामुळे काही जणांपासून माझ्यात दुरावा निर्माण झाला. पण अभिषेकने या सिझनची ट्रॉफी जिंकावी अशीच माझी इच्छा आहे”, असं ती म्हणाली.

कुठे आणि कधी पाहता येईल?

‘बिग बॉस ओटीटी २’चा ग्रँड फिनाले ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर होणार आहे. या फिनालेमध्ये अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या शोचा महाअंतिम सोहळा आज १४ ऑगस्ट रोजी रात्री ९ नंतर जिओ सिनेमावर मोफत पाहता येईल. विशेष म्हणजे यावेळी बिग बॉसचा फिनाले हा रविवारी नसून, सोमवारी पार पडणार आहे. हे बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.

बिग बॉस ओटीटी सीझन २च्या विजेत्याला यावेळी बक्षीस म्हणून २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. यासह, बिग बॉस ओटीटी २ची ट्रॉफी देखील मिळणार आहे. यावेळी महाअंतिम सोहळ्याला पाहुणा म्हणून अभिनेता शाहरुख खान हजेरी लावण्याची शक्यता आहे. शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या सेटवर येणार आहे.

Share this article