Close

कोकणातील रक्षणकर्ता ग्रामदैवताची कथा सांगणारी मालिका “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” : बॉलिवूड अभिनेता ‘उमाकांत पाटील साकारणार वेतोबाची भूमिका (Bollywood Actor Umakant Patil To Play Title Role In Marathi Serial,” Kshetrapaal Shree Dev Vetoba”)

कोकणातील परंपरा, प्रथा, रुढींशिवाय  तेथील गूढ गोष्टींविषयी कायमच महाराष्ट्राला एक प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे ‘वेतोबा’. भक्तांचा रक्षणकर्ता, कोकणचा क्षेत्रपाल, संकट निवारक आणि सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणजे ‘श्री देव वेतोबा’. खरं तर वेतोबा म्हणजे भूतनाथ. पण कोकणात संकटसमयी भक्तांच्या हाकेला देवासारख्या धावून जाणाऱ्या वेतोबाला देवाचे स्थान आहे.

संकटसमयी वेगवेगळ्या रूपांत हाकेला धावून येणाऱ्या वेतोबाची प्रचिती कित्येक गावकऱ्यांना आलेली आहे.  हातात काठी घेऊन भव्य-दिव्य देहरूप असलेला वेतोबा गावांच्या वेशींवर गस्त घालतो. कुणी भक्त संकटात असेल तर त्याचे रक्षण करतो. एवढंच नव्हे तर कोणतेही मोठे काम सुरु करण्यापूर्वी किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोकणवासी आपल्या लाडक्या वेतोबाचा कौल घेतात. तशी प्रथाच आहे कोकणात.

श्री देव वेतोबा’चे मंदिर कोकणातील आरवली या ठिकाणी वसलेले असून हे अत्यंत जागृत असे देवस्थान मानले जाते. रक्षणकर्ता वेतोबाच्या अशा अनेक गोष्टी १७ जुलैपासून ‘सन मराठी’ वाहिनीवरील “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” या नवी मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहेत.

आता वेतोबाची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असणार. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’, ‘सूर्यवंशी’, ‘सिंबा’, संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठीयावाडी’ इत्यादी हिंदी तसेच तामिळ सिनेमा ‘काला’ आणि ‘एक्सट्रॅक्शन’ या हॉलिवूडपटात अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता उमाकांत पाटील वेतोबाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा विचार केला असता त्याची शरीर रचना, बांधा, रूप पाहून वेतोबा ह्या भूमिकेला उमाकांत योग्य न्याय देईल याची खात्री वाटते.

‘सोमिल क्रिएशन’ प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सुनील भोसले निर्मित “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेचे दिग्दर्शन नितिन काटकर यांनी केले असून निलेश मयेकर निर्मिती संकल्पक ह्या भूमिकेत आहेत. तसेच राजेंद्रकुमार घाग यांनी पटकथा आणि महाबळेश्वर नार्वेकर यांनी संवाद लिहिले आहेत.

Share this article