Close

अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘सिल्वर कॉइन’ चे अनावरण : दागदागिन्यांच्या महोत्सवाचा कार्यक्रम घोषित (Bollywood Actress Bhagyashree Unveiled ‘ Silver Coin ‘ To Commemorate ” Azadika Amrit Mahotsav” For India Jewellery Shopping Festival)

“संपूर्ण जागाचे लक्ष जावे अशी कलाकुसर आपल्या भारतीय दागिन्यांमध्ये आढळते. आपल्याकडील दागिन्यांची डिझाइन्स जगभरात प्रसिद्ध आहेत. मनीष मल्होत्रा किंवा करण जोहर यांच्यापेक्षा अधिक लक्षवेधी कामगिरी व्हावी. अन्‌ ऑस्कर ॲवॉर्डस्‌च्या समारोहात आपली भारतीय ज्वेलरी कलाकारांनी घालावी, अशी आशा मी व्यक्त करते,” असे उद्‌गार बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने काढले.

येत्या ऑक्टोबर महिन्यात, ऑल इंडिया जेम ॲन्ड ज्वेलरी कौन्सिल या संस्थेतर्फे इंडिया ज्वेलरी शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची घोषणा करण्याच्या कार्यक्रमात भाग्यश्रीच्या हस्ते लिमिटेड एडिशन असलेल्या चांदीच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हे अनावरण झाले. सदर महोत्सव केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा महोत्सव ठरेल आणि त्यात भाग घेण्यासाठी परदेशी पाहुणे विमानाची तिकीटे बुक करून आपल्या देशात येतील, असा आशावाद भाग्यश्रीने व्यक्त केला.

या शॉपिंग फेस्टिवलचे उद्दिष्ट सांगताना निमंत्रक व जी. जे. सी. चे संचालक दिनेश जैन म्हणाले की, ज्वेलरी चाहत्यांच्या मनात भारताला मानाचे स्थान मिळवून देणे आणि ज्वेलरी टुरिझमला चालना देणे, हे कंपनीचे ध्येय आहे. कारण येथील नाजुक डिझाइन्स आणि उत्कृष्ट नक्षीकामासाठी आपला देश जगभरात ओळखला जातो.

सदर महोत्सव जगातील सर्वात मोठा असेल, असे सांगून यामध्ये देशातील लहानमोठे ज्वेलर्स एका मंचावर येतील व त्याद्वारे ५० लाख लोक जोडले जातील, असे सहनिमंत्रक मनोज झा यांनी सांगितले. ३०० शहरातील ५ हजार ज्वेलर्सचा या महोत्सवात सहभाग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या महोत्सवात २५ हजार रुपयांचे दागिने खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला चांदीचे नाणे भेट मिळेल. तसेच प्रत्येकाला कूपन देण्यात येणार असून त्याच्या सोडतीमधून ४० किलो सोने, ३ कोटी रुपयांची ज्वेलरी आणि डिव्हाइन सॉलिटेअर डायमंडस्‌चा मुलामा असलेली १०० सोन्याची नाणी तसेच ३ हजार किलो चांदीची खास अमृत महोत्सव चांदीची नाणी स्मरणिका म्हणून जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळेल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

Share this article