बॉलिवूडमधील डिंपल गर्ल अन् IPL मध्ये पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून काहीशी दूरच आहे. पण प्रितीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रिती तब्बल ६ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतेय.
प्रिती झिंटा आगामी 'लाहोर 1947' या चित्रपटात झळकणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असेल. या चित्रपटात प्रितीसोबत अभिनेता सनी देओल प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय राजकुमार संतोषी या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून अनेक वर्षांनी संतोषी आणि आमिर खान एकत्र काम करत आहेत.
काल २४ जानेवारी रोजी प्रीती झिंटा मुंबईतील एका स्टुडिओतून बाहेर पडताना दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार प्रिती 'लाहोर 1947' च्या लुक टेस्टसाठी स्टुडिओमध्ये पोहोचली होती. प्रीती या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनी सनी देओलसोबत पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सनी आणि प्रीती यांनी 'हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'फर्ज' आणि 'भैयाजी सुपरहिट' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी ९० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. यामध्ये घायल, दामिनी, घातक यांसारखे हिट सिनेमांचा समावेश आहे. 'गदर 2' नंतर सनी देओल 'लाहोर 1947' सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमिर खान आणि संतोषी हे ''अंदाज अपना अपना' नंतर एकत्र काम करणार आहेत.
आता प्रिती - सनी - आमिर खान यांच्या 'लाहोर 1947' ची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा २०२५ ला भेटीला येण्याची शक्यता आहे.